
औरंगाबाद : वृत्तसंस्था
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे संजय शिरसाट यांच्याकडून काल (१२ ऑगस्ट) एक ट्विट पोस्ट झालं. त्या ट्विटमध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांचा ‘महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख’ असा उल्लेख केला होता. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने संजय शिरसाट नाराज असल्याची चर्चा सुरू होती. अशातच टि्वटसोबत त्यांनी विधानसभेतील उद्धव ठाकरेंचं एक भाषणही जोडलं होतं. पण काही मिनिटांतच त्यांनी ते ट्वीट डिलीटही केलं. त्यामुळे शिरसाट दबावतंत्र वापरत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या होत्या. अखेर त्यांनी पत्रकार परिषद घेत या ट्विटबाबत खुलासा केला आहे.
“मी दबावतंत्र कधी वापरलं नाही, कधी तसे करणार नाही. काल टेक्निकल प्रॉब्लेममुळे ट्विट पोस्ट झालं. ते ट्विट मार्च महिन्यातलं होत आणि चुकून पोस्ट झालं. माझ्या लक्षात आल्यानंतर लगेच डिलीट केलं. असा खुलासा करत औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांनी ट्विटचा खुलासा केला आहे.
या विस्तारात मला मंत्रिपद न मिळाल्याने मी नाराज होतो. पण पुढच्या विस्तारात मंत्रिपद देण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शब्द दिला आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या काळात अनेक घटना घडल्या. उठाव करताना काहीजण मंत्रिपदे सोडून शिंदे गटात आले. सर्वांनाच मंत्रिपद मिळावं अशी अपेक्षा होती. राजकारणात सर्वांना पुढे जायचं असतं. माझीही मंत्री होण्याची इच्छा आहे. कोणतीही राजकीय भूमिका घेताना कशाला प्राधान्य द्यावं हे वरिष्ठ ठरवतात. त्याप्रमाणे पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला. मला मंत्रिपद मिळाले नाही. म्हणून मी शिंदेवर कोणतेही दबावतंत्र वापरणार नाही, आमच्यात कोणतेही वाद नाहीत, असं शिरसाट यांनी सांगितलं.




















