जळगाव मिरर | २८ जानेवारी २०२६
राजकीय विश्वात असताना दोनवेळा विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्याने राजकीय अंत होण्याच्या वाटेवर असताना ज्या अजित दादांनी मला नवी वाट,नवी दिशा,नवा आनंद आणि नवीन राजकीय वैभव दिले तेच अजितदादा आज कायमचे सोडून गेल्याने माझा आनंदच आज हरपला आहे.
खरेतर अजितदादाच्या जाण्याने मी खऱ्या अर्थांने आज निशब्द तर झालोच पण सोबतच सर्वस्वच गमावून बसलो आहे.मला आजही आठवतो तो माझा अड्चणीचा काळ, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून दोन वेळा विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर माझ्या राजकीय भविष्याचे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.सोबतच सततच्या पराभवामुळे आर्थिक संकटात येऊन व्यवसायातही अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या.शेकडो जिवाभावाचे कार्यकर्ते सोबत होते मात्र मनोधैर्य मात्र खचले होते.अश्या खचलेल्या परिस्थितीत आदरणीय अजितदादांच्या संपर्कात मी आलो,पहिल्याच भेटीत दादांनी माझ्या अंतर्मनातील घालमेल ओळखली,आणि पाठीवर हात ठेवून लढण्याचे बळ दिले.खरेतर त्यादिवशी दादांनी माझ्या पाठीवर ठेवलेला हात माझ्यासाठी साक्षात भगवंतांच्या आशीर्वादापेक्षा कमी नव्हता.काही दिवसात व्यवसायिक अडचणी देखील दादांनी सोडविल्याने लढण्यासाठी अजून बळ मिळाले.त्यावेळी भाजपा मध्ये जोरदार इन्कमिंग होत असताना केवळ अजितदादांसारख्या कणखर नेतृत्वावर मी विश्वास ठेवून व असंख्य कार्यकर्त्याना विश्वासात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवारात सामील झालो.आणि जनतेच्या आशीर्वादाने अमळनेर विधानसभा मतदारसंघात आमदार झालो.सुरवातीला मोठया विश्वासाने पक्षाचा मुख्य प्रतोद म्हणून मोठी जबाबदारी माझ्यावर दिली.एवढेच नव्हे तर राष्ट्रवादी दुसऱ्यांदा सत्तेच्या प्रवाहात आल्यानंतर कॅबिनेट मंत्री देऊन एका सामान्य कार्यकर्त्यांचा मोठा सन्मान दादांनी केला.त्यामुळे अमळनेर तालुक्यासाठी जलसंजीवनी असणाऱ्या निम्न तापी पाडलसरे धरणाला गती मी देऊ शकलो,न भूतो न भविष्यती अशी कोट्यवधीची विकासकामे मतदारसंघात करू शकलो.पक्षाच्या माध्यमातून विविध पदांची जवाबदारी देऊन राज्य स्तरावरील व्यासपीठ देण्याचा प्रयत्नही दादांनी केला.2024 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीतही दादांच्या आशीर्वादाने दुसऱ्यांदा आमदारकीचा बहुमान मिळाला.
दादांसारखं नेतृत्व पाठीशी असल्याने कुठलीही चिंता नव्हती,घटनेच्या एकदिवस आधीच दादांची मुंबईत भेट होऊन बऱ्याच सकारात्मक चर्चा झाल्या होत्या.पण नियतीने खेळ केला आणि ती सकारात्मक भेट अखेरची ठरून दादा कायमचे नॉट रीचेबल झाले.
खरे पाहता. या दुर्देवी घटनेमुळे २८ जानेवारी २०२६ हा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासातील काळा दिवस ठरला आहे. ज्यांच्या शब्दाला शब्दाने मान देणारे आम्ही हजारो कार्यकर्ते आणि नेते आज पोरके झालो आहोत. बारामती येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात आमचे नेते, मार्गदर्शक आणि महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अकाली निधन झाल्याचे वृत्त ऐकूनच माझ्या पायाखालची जमीन सरकली आहे. हा धक्का पचवणे केवळ कठीण नाही, तर अशक्य आहे.
दादा केवळ राज्याचे उपमुख्यमंत्री नव्हते, तर ते अहोरात्र काम करणारे एक ‘यंत्र’ होते. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत जनतेच्या सेवेत मग्न असणारे असे नेतृत्व पुन्हा होणे नाही.अमळनेर असो वा संपूर्ण उत्तर महाराष्ट्र, दादांनी नेहमीच विकासाच्या बाबतीत झुकते माप दिले.
“अनिल, तू काम कर, मी तुझ्या पाठीशी आहे,” हा त्यांचा तो खंबीर आवाज आज नियतीने कायमचा शांत केला. त्यांचा हा ‘अपघाती मृत्यू’ महाराष्ट्राच्या काळजाला चटका लावणारा आहे. स्पष्टवक्तेपणा, प्रशासनावरील वचक आणि शब्दाला जागणारा नेता म्हणून दादांची ओळख होती. आज ‘विकासाचा महामेरू’ कोसळला आहे.या कठीण प्रसंगी आम्ही सर्वजण पवार कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत. सुनेत्रा वहिनी, पार्थ आणि जय यांच्यावर कोसळलेला हा डोंगर सावरण्याची शक्ती ईश्वर त्यांना देवो. दादा, तुम्ही आम्हाला सोडून गेलात तरी तुमचे विचार आणि तुम्ही दाखवलेला विकासाचा मार्ग आम्ही कधीच सोडणार नाही. अशी प्रतिक्रिया माजी मंत्री अनिल पाटील यांनी व्यक्त केली आहे.




















