शिर्डी येथे आजपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसीय शिबिराला सुरुवात होत आहे. त्यापूर्वी माध्यमांशी संवाद साधताना अजित पवारांनी शिंदे सरकारवर सडकून टीका केली. यावेळी अजित पवार म्हणाले कि, दोन-दोन लाख कोटी गुंतवणूक असलेले प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस सातत्याने राज्यात मोठे प्रकल्प येणार आहेत, अशी बतावणी करत आहेत. राज्यात नेमके कोणते मोठे प्रकल्प येणार आहेत, त्याची यादी तरी द्या,
अजित पवार म्हणाले, ज्या प्रकल्पांमधून राज्यात दोन-दोन लाख तरुणांना रोजगार मिळणार होता व लाखो कोटींची गुंतवणूक होणार होती, ते प्रकल्प शिंदे व फडणवीस यांनी राज्यातून बाहेर जाऊ दिले. त्यानंतर राज्यात यापेक्षाही मोठे प्रकल्प येणार आहे, असे गाजर ते दाखवत आहे. एकीकडे राज्यातच नव्हे तर देशभरात महागाई व बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. त्यामुळे तरुणांमध्ये प्रचंड रोष आहेत. त्यामुळेच ते मोठे प्रकल्प येणार आहेत, असे आश्वासन देत आहे. मात्र, हे मोठे प्रकल्प कोणते त्यांची नावे सांगा, प्रकल्पांची यादी द्या.
अजित पवार म्हणाले, आजपासून सुरू होणाऱ्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनात केवळ राजकीय क्षेत्रातील मान्यवरच पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील असे नाही, तर वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरही मार्गदर्शन करणार आहेत. देश, राज्याच्या स्थितीवर गंभीर विचारमंथन केले जाईल. तसेच, राज्यात कधीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. पक्षाने या दृष्टीने तयार असायलाच हवे, या दृष्टीनेही शिबिरात चर्चा करण्यात येईल. आगामी निवडणुकांचा वेध व तयारीचे मंथन या शिबिरात करण्यात येणार आहे.
अजित पवार म्हणाले, आज शिबिराच्या पहिल्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही हजर व्हायचे होते. त्यामुळेच ब्रीच कँडी रुग्णालयात आधीच त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी आज त्यांना रुग्णालयातून बाहेर जाण्यास नकार दिला आहे. त्यामुळे शरद पवार आज शिबिराला येऊ शकणार नाही. मात्र, उद्या शिबिराला ते यावेत, यासाठी प्रयत्न केले जातील. डॉक्टरांच्या सल्ल्यावरच उद्याची त्यांची उपस्थिती अवलंबून असेल. डॉक्टरांनी पुन्हा नकार दिल्यास शरद पवार व्हिडिओ कॉन्फन्सिंगच्या माध्यमाने शिबिराला संबोधित करतील.
अजित पवार म्हणाले, वेगवेगळ्या विभागांमधून ज्या नोकर भरत्या केल्या जातात, त्याबाबतचे नियुक्तीपत्रे त्या विभागाच्या अधिकाऱ्यांकडूनच दिली जातात. आम्हीही अनेक वर्षे सरकारमध्ये काम केले आहे. आतापर्यंत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी उमेदवारांना नियुक्तीपत्रे दिल्याचे पाहिले नाही. बेरोजगारी व महत्त्वाचे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने तरुणांमध्ये जो रोष आहे, तो कमी करण्याचा केविलवाणा प्रयत्न अशा पद्धतीने सरकार करत आहे.
अजित पवार म्हणाले, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत मविआ काळातच वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर गेल्याचे सांगितले. हे धादांत खोटे आहे. राज्यात शिंदे सरकार आल्यानंतर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली वेदांता-फॉक्सकॉनबाबत उच्च स्तरिय बैठक झाली. स्वत: मुख्यमंत्री शिंदे यांनी सभागृहात राज्यात वेदांता प्रकल्प येणार असल्याचे सांगितले. कंपनीला त्यांनी त्याबाबत पत्रही पाठवले होते. आमचे सरकार असतानाच हा प्रकल्प राज्याबाहेर गेला होता, तर तुम्ही सत्तेत आल्यावर बैठका, कंपनीला पत्र का पाठवले, असा सवाल पवारांनी केला.