जळगाव मिरर | २० जून २०२५
यावल तालुक्यातील किनगाव शिवारातील ‘मनमंदिर’ परमिट रूम आणि लॉजिंगच्या नावाखाली सुरू असलेल्या अवैध वेश्याव्यवसायाचा यावल पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी छापा टाकून चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील किनगाव शिवारातील चोपडा ते यावल महामार्गाजवळ असलेल्या मनमंदिर परमिट रूम व लॉजिंगमध्ये बेकायदेशीर वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती यावल पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे, पोलिसांनी गुरुवारी १९ जून रोजी सायंकाळी सहा वाजता या ठिकाणी छापा टाकला.
पोलिसांनी केलेल्या कारवाईत तेथील पीडित महिलांची सुटका करण्यात आली. तसेच, घटनास्थळावरून मोबाईल, रोकड आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल वासुदेव मराठे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित आरोपी गोपाळ निंबा पाटील (वय २८, रा. दहिगाव, ता. यावल), पराग लोहार (वय २४, रा. खेडी खुर्द, ता. जळगाव), आणि समाधान शालिक तायडे (वय २२, रा. साखळी, ता. यावल) या तीन जणांविरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करत आहेत. या कारवाईमुळे परिसरात अवैध धंद्यांना आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
