जळगाव मिरर । १५ नोव्हेबर २०२२
कोरोना काळापासून पोलीस भरती राज्य सरकारने घेतली नाही पण तरीही तरुण पोलीस भरतीचा नेहमी सराव सुरूच होता, पण आता या भरतीत उमेदवार कोणत्याही एकाच जिल्ह्यासाठी अर्ज करु शकतील, या अटीमुळे दिवसरात्र पोलीस होण्यासाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये असंतोष पसरला आहे. ही अन्यायकारक अट रद्द करण्याची मागणी उमेदवारांनाकडून होत आहे. पोलीस भरतीचे स्वप्न बाळगून अनेक वर्षे मैदानात घाम गाळून तसेच वाचनालयात मेहनत करुन भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीच्या अटीने निराश केले आहे.
राज्यभरात पोलीस शिपाईच्या 18 हजार जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. सर्वाधिक सात हजार जागा मुंबई आयुक्तालया अंतर्गत आहेत. यामध्ये एका जिल्ह्यात शहर, ग्रामीण आणि लोहमार्ग पोलीस अशा गटांत भरती होत आहे. मात्र, कोणत्याही एका गटात एकच अर्ज भरता येण्याची अट यामध्ये असल्याने यामुळे पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या हजारो उमेदवारांवर अन्याय होणार आहे. गृहविभागाने ही अट रद्द करावी, अशी मागणी केली जात आहे. उमेदवारांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले. राज्य शासनाच्या निर्णयाचा निषेध व्यक्त करीत त्वरित शुद्धीपत्रक काढून ही अन्यायकारक अट रद्द करण्याची मागणी केली.