
जळगाव मिरर | ६ मार्च २०२५
शहरातील शिवकॉलनी लगत असलेल्या महामार्गावर रात्री ११.१५ वाजेदरम्यान भरधाव कंटेनरने दुचाकीला दिलेल्या धडकेत ५० वर्षीय प्रौढाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. यामुळे रात्री महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान, या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी शिवकॉलनी परिसरात रास्तारोको करुन शहराबाहेरील महामार्गाचे काम तत्काळ पूर्ण करावे, अशी मागणी केली.
मिळालेल्या माहितीनुसार, आशाबाबा नगरातील रहिवासी विजय नामदेव भोई (वय ४५, रा.) यांचा मृत्यू झाला. शिवकॉलनीत असलेली आपली टपरी व सोडा वॉटरचे दुकान बंद करुन विजय भोई हे घराकडे जात असताना धुळ्याकडून भुसावळकडे जाणाऱ्या भरधाव कंटेनरने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात विजय भोई यांचा जागीच मृत्यू झाला, दरम्यान त्यांच्या जवळील कागदपत्रावरुन त्यांची ओळख पटली. यानंतर संतप्त झालेल्या परिसरातील नागरिकांनी रास्तारोको आंदोलन केले. त्यामुळे महामार्गावरील दोन्हीकडील वाहतूक ठप्प झाली होती. तर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.
दरम्यान, शहराबाहेरुन जाणाऱ्या महामार्गाचे काम तत्काळ पूर्ण करुन दिलासा द्यावा, अशी मागणी यावेळी संतप्त नागरिकांकडून करण्यात आली. दरम्यान त्यांच्या पत्नीचाही सहा महिन्यांपुर्वी रस्ता अपघातात मृत्यू झाल्याचे समजते. दरम्यान, मयत भोई यांचा मूतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आला होता