जळगाव मिरर | ९ फेब्रुवारी २०२४
अनुभूती इंग्लीश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नॅशनल एज्युकेशन पॉलीसी-२०२३ च्या धर्तीवर यंदाचा ‘एड्युफेअर-२०२४’ आयोजित केला असून यामध्ये चांद्रयानासह हडप्पा संस्कृती समजेल. सोबतच विज्ञान, गणित, समाजशास्त्रासह भाषिक कौशल्याला चालना देण्यासाठी एड्युफेअर महत्त्वाचा असून मनोरंजनातून शिक्षण घेण्याची संधी जळगावकरांनी चुकवू नये असे आवाहन अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ. निशा जैन यांनी केले.
शिक्षणाविषयी गोडी निर्माण करणाऱ्या अनुभूतीतर्फे आयोजित एड्युफेअरचे उद्घाटन जैन परिवारातील सुनीता भंडारी यांच्याहस्ते फित सोडून झाले. याप्रसंगी सौ. ज्योती जैन, सौ. शोभना जैन, डॉ. भावना जैन, प्राचार्य रश्मी लाहोटी, जनसंपर्क अधिकारी रूपाली वाघ, मनोज दाडकर उपस्थित होते. आजपासून ११ फेब्रुवारी असे तीन दिवस खान्देश सेंट्रल मॉलच्या मैदानावर संध्याकाळी ४.३० ते ८.३० वाजेदरम्यान मनोरंजनातून शिक्षणाची सफर करता येईल. ‘खेळता खेळता शिका व शिकता शिकता खेळा’ ह्या संकल्पनेवर आधारित एड्युफेअरमध्ये १४ झोन असून ८० पेक्षा जास्त खेळ अनुभवता येतील. नॅशनल एज्युकेशन पॉलिसीप्रमाणे चार वयोगटानुसार खेळांची विभागणी केली आहे. यामध्ये भाषिक कौशल्याला चालना देणाऱ्या इंग्रजी, हिंदी, मराठी मध्ये अनेक खेळ आहेत. चांद्रयान-३ च्या यशस्वीतेवर विज्ञान झोन, नासा, रशियाच्या स्पेस कार्यावर अनेक वर्किंग मॉडेल असतील, यातून प्रत्यक्ष इस्रो मध्ये असल्याची अनुभूती होईल. गणिताची आवड निर्माण व्हावी यासाठी बुद्धिमत्ता, तर्कशक्ती व सृजनशिलतेला चालना देता येईल. मनोरंजनातून विज्ञान, गणित, समाजशास्त्र, संगीत, हस्तकला, योगनृत्यकलेचा आविष्कार पाहता येणार आहे. यात पपेट शो, नृत्य, संगीत, तबला, लाठी-काठी नृत्य, बासरी, चार्ली चैपलिन यासह विद्यार्थ्यांनी स्वत:च्या हाताने बनविलेल्या हस्तकलेच्या २००० पेक्षा जास्त वस्तूंचे प्रदर्शन बघता येईल. अॅडव्हेंचर गेम झोनमध्ये जे पारंपारिक खेळ नामशेष होण्याच्या मार्गावर तेही पाहता येणार आहे. यासोबतच चटकदार व्हॅली स्पाईस खाऊ गल्ली चासुद्धा अनुभव घेता येणार आहे. यात पालकांसह विद्यार्थ्यांचे विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आहे.
अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांनी एड्युफेअरमध्ये सिंधू संस्कृतीची नगरचना साकारलीय. हडप्पाकालीन स्थापत्य, घरे, तटबंदी, धान्याची कोठारे अशी २०० च्यावर मॉडेल विद्यार्थ्यांनी साकारली आहेत. पुस्तकी ज्ञानापेक्षा सिंधू संस्कृती प्रत्यक्ष अभ्यासण्याची संधी यावेळी उपलब्ध करून देण्यात आली आहे.