
जळगाव मिरर | २० फेब्रुवारी २०२४
जळगाव शहरातील एका परिसरात बेकायदेशीररित्या गावठी पिस्तूल घेऊन दहशत पसरवणाऱ्या संशयित ईश्वर रामा पारधी (वय २३, रा. धानोरा बुद्रुक, ता. जळगाव) याला शनिपेठ पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली. त्याच्याकडून पाच हजार रुपये किंमतीचे गावठी पिस्तूल हस्तगत केले असून त्याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील काशीबाई उखाजी कोल्हे शाळेच्या पाठीमागील भागात संशयित ईश्वर पारधी हातात गावठी पिस्तूल घेऊन परिसरात दहशत पसरवत असल्याची माहिती शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले, पोलीस हवालदार परिष जाधव, राहुल पाटील, राहुल घेटे, अनिल कांबळे यांना कारवाईच्या सूचना दिल्या.
पथकाने संबधित ठिकाणी जाऊन पाहणी केली असताना संशयित ईश्वर पारधी हा आरडोओरड करून दहशत पसरवत होता. पोलिसांना पाहून त्याने पळ काढला. मात्र पोलिसांनी त्याला पाठलाग करून ताब्यात घेतले. त्याच्याकडून पाच हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी पोलीस शिपाई राहुल पाटील यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून संशयित ईश्वर पारधी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार परिष जाधव करीत आहेत.