जळगाव मिरर | ४ एप्रिल २०२४
केटरींगचे काम आटोपून घराकडे निघालेल्या आचारीला अडवून त्याला मध्यरात्री मारहाण केली. दुसऱ्या दिवशी त्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या हेमंत बाळकृष्ण सपकाळे (वय २८, रा. खोटेनगर) यांना टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना दि. ३१ मार्च रोजी घडली. याप्रकरणी टोळक्याविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील खोटे नगरात हेमंत बाळकृष्ण सपकाळे हा तरुण रहात असून त्याचा केटरींचा व्यवसाय आहे. दि ३१ मार्च रोजी रात्री केटरींचे काम आटोवून ते दुचाकीने गणेश कॉलनीतून जात असतांना त्यांना पाच ते सहा इसमांनी रस्त्यात विनाकारण थांबवले. तसेच त्यांची विचारपुस करीत दारुच्या नशेत असलेल्यांनी त्याला बेदम मारहाण केली. यावेळी तरुण काहीही न बोलता त्याठिकाणाहून निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी हेमंत सपकाळे हा भाऊ व शालकाला घेवून गुंजन खरेदी विक्री केंद्राजवळ राहणाऱ्या लोकेश देवराज यांच्याकडे गेला. थोड्या वेळाने लोकेश याने काही तरुणांना बोलावून लाकडी दांडुक्याने हेमंत सपकाळे याला बेदम मारहाण केली.
मारहाणीत टोळक्यातील एकाने डोक्यावर लाकडी दांडुका मारल्यामुळे तो गंभीर जखमी होवून बेशुद्ध पडला होता. तसेच त्याच्या भावासह शालकांना देखल मारहाण केली. त्यांच्यावर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरु आहे. हेमंत सपकाळे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन टोळक्याविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे