जळगाव मिरर | ५ एप्रिल २०२४
ऐन लग्नसराईचा हंगाम सुरू झालेला असतानाच गेल्या काही दिवसांपासून सोने भाव खायला लागले आहे. सराफ बाजारात गुरुवारी सोन्याचा १० ग्रामचा भाव ७० हजारांच्या समीप म्हणजे ६९,६३० रुपयांवर गेला. सोने दराच्या या नव्या उच्चांकामुळे लग्नाच्या हंगामात खरेदीसाठी बाहेर पडलेल्या सर्वसामान्यांच्या खर्चात मोठी वाढ होऊन बजेट कोलमडून पडले आहे. जागतिक पातळीवरील भौगोलिक – राजकीय तणाव लक्षात घेऊन मध्यवर्ती बँकांनी सुरक्षित पर्याय म्हणून सोने खरेदीचे प्रमाण वाढवले.
आहे. याचा परिणाम सोन्याच्या किमतीमध्ये अनपेक्षित वाढ होण्यावर झाला आहे. पिवळ्या मौल्यवान धातूच्या किमतीमधील हा चढता कल असाच आणखी कायम राहण्याचा अंदाज सराफ बाजारातील जाणकार व्यक्त करत आहेत.
या भाववाढी मागचे कारण सांगताना पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ म्हणाले की, जगाच्या विविध भागांतील भौगोलिक-राजकीय तणाव, युक्रेन-रशिया संघर्ष या सर्व अनिश्चिततेच्या वातावरणात सोन्याचे भाव अपेक्षित नसलेल्या वेगाने वाढत आहेत. त्यामुळे चीन तसेच रशियासह इतर मध्यवर्ती बँकांकडून सोने खरेदीचे प्रमाण वाढले आहे. सर्व स्तरांतून सोन्यातील गुंतवणुकीची मागणी वाढली आहे.