जळगाव मिरर | ९ जानेवारी २०२६
जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असतानाच प्रभाग क्रमांक 1 मध्ये राजकीय समीकरणे झपाट्याने बदलताना दिसत आहेत. अपक्ष उमेदवार चेतन सुरेश महाले यांनी आक्रमक, नियोजनबद्ध आणि लोकाभिमुख प्रचाराच्या जोरावर थेट आघाडी घेतल्याने प्रस्थापित पक्षांच्या उमेदवारांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
घराघरांत पोहोचणारा थेट संवाद, स्थानिक प्रश्नांवर नेमकी बोट ठेवणारी भूमिका आणि तरुणांची मोठ्या प्रमाणावर मिळणारी साथ यामुळे महाले यांचा प्रचार दिवसेंदिवस अधिक वेग घेत आहे. “पक्ष नाही, पण जनतेची ताकद आहे” हा नारा प्रभागात चांगलाच रुजताना दिसत असून पारंपरिक राजकारणाला कंटाळलेल्या मतदारांचा कल स्पष्टपणे महाले यांच्याकडे झुकत आहे.
दुसरीकडे, प्रस्थापित उमेदवारांचा प्रचार मात्र ठराविक चौकटीत अडकलेला दिसून येत असून वाढती गर्दी, उत्स्फूर्त प्रतिसाद आणि बदलाची लाट पाहून त्यांच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. अनेक ठिकाणी अंतर्गत नाराजी आणि मतांचे विभाजनही उघड होत असल्याचे चित्र आहे.
प्रभाग क्रमांक 1 मध्ये यावेळी लढत केवळ पक्षीय न राहता जनता विरुद्ध प्रस्थापित व्यवस्था अशी होत असल्याची चर्चा रंगली आहे. जर हीच परिस्थिती कायम राहिली, तर निवडणूक निकालाच्या दिवशी मोठा राजकीय धक्का बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
एकूणच, जळगाव मनपा निवडणुकीत प्रभाग क्रमांक 1 हा ‘हॉटस्पॉट’ ठरत असून अपक्ष चेतन सुरेश महाले यांनी निर्माण केलेली ही लाट शेवटपर्यंत टिकते का, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.




















