जळगाव मिरर । २० सप्टेंबर २०२३
मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित कै. ग. सु. वराडे औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुक्ताईनगर येथे 2022-2 023 च्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ पार पडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा तथा मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसाटीच्या चेअरमन ॲड. रोहिणी खडसे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष नारायणराव चौधरी, संचालक आर एम खाचने, पुरुषोत्तम महाजन, जळगाव येथील उद्योजक अरुण बोरोले, चंद्रकांत बेंडाळे प्राचार्य सुजित पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी ॲड. रोहिणी खडसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या तुम्ही सर्व यशस्वी रित्या व्यावसायिक तांत्रिक शिक्षण आत्मसात करून कुशल तंत्रज्ञ बनले आहात. तुम्हाला औद्योगिक क्षेत्रात नोकरीच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे बहुसंख्य विद्यार्थ्यांचा कल हा नोकरी करण्याकडे असतो.
आपल्याकडे नोकरीत जबाबदारी कमी, पगार जास्त आणि वयाच्या 58 वर्षापर्यंत फारसा ताण न घेता नोकरी करता येते असा समज आहे. खऱ्या अर्थाने सुरक्षित नोकरी असल्याने अनेकांचा कल तिच्याकडे असतो. परंतु नोकरी करण्या पेक्षा स्वतःचा उद्योग सुरू करून उद्योजक व्हा व नोकरी करणारे न बनता नोकरी देणारे व्हा. तुम्हाला ज्या गोष्टीचे ज्ञान आहे रुची आहे त्या क्षेत्रात उद्योग सूरू करा.
त्यासाठी एक दोन वर्षे नोकरी करून अनुभवी व्हा आणि त्यानंतर उद्योजक होण्यासाठी झोकून द्या.
तुम्हाला ज्या क्षेत्रात उद्योग करायचा आहे, त्या क्षेत्राच्या प्रत्येक बारीक-सारीक गोष्टीचे ज्ञान मिळवा. उद्योग सुरू केल्या नंतर कुठल्याही कामाची लाज न बाळगता काम करण्याची तयारी ठेवून सकारात्मक विचार करून नकारात्मक भूमिका सोडून आपले ध्येय निश्चित करून. ते गाठण्यासाठी प्रयत्न करावेत. जिद्द, मेहनत, संयम व चिकाटीच्या जोरावर उद्योजकतेत नक्कीच यशस्वी होता येते.
यावेळी कर्मचारी, विद्यार्थ्यांचे पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.