जळगाव मिरर | २० जानेवारी २०२६
मध्यप्रदेशातील गुन्ह्यातील एका आरोपीला अटक करण्यासाठी आलेल्या पोलीस पथकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आणि जळगाव जिल्ह्यासह इतर राज्यांत चेन स्नॅचिंगचा धुमाकूळ घालणाऱ्या ‘इराणी टोळी’वर जळगाव पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. भुसावळ शहरातील मुस्लिम कॉलनी परिसरात राबविण्यात आलेल्या व्यापक कोंबिंग ऑपरेशनमध्ये पोलिसांनी तब्बल ४० लाख २५ हजार रुपये किमतीचे सोने, एक गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि १६ चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत. ही माहिती पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी सोमवारी (१९ जानेवारी) पत्रकार परिषदेत दिली.
१५ जानेवारी रोजी मध्यप्रदेशातील बडोद पोलीस ठाण्याचे पथक करारअली हुजूर अली या आरोपीला पकडण्यासाठी भुसावळ येथे आले होते. त्यावेळी जुल्फिकार अली ऊर्फ श्री इराणी याच्या घराजवळ १५ ते २० जणांच्या जमावाने पोलिसांना घेरून जिल्हाधिकाऱ्यांच्या जमाबंदी आदेशाचे उल्लंघन करत विटा व लाकडी दांडक्यांनी हल्ला केला. काही महिलांनी पोलिसांना चावा घेतल्याचीही घटना घडली, तर “तुमची नोकरी घालवू” अशी धमकी देत दहशत निर्माण करण्यात आली. या घटनेनंतर आरोपी फरार झाले होते.
या गंभीर प्रकारानंतर पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखा व बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या पथकाने परिसरात मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू केली. घरझडतीदरम्यान मरियम बी जाफर अली जाफरी आणि नाझिया टिपू शेख यांच्या घरातून २८७.७ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या लग्गडी जप्त करण्यात आल्या.
चौकशीत या टोळीतील हसनअली ऊर्फ आसू, सादिक ऊर्फ आतंक आणि इतर सदस्यांनी जळगाव जिल्हा, अमरावती व मध्यप्रदेशातील विविध भागांत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरल्याचे उघड झाले. चोरीचे दागिने वितळवून सोन्याच्या लग्गडी तयार करण्याचे काम या दोन महिला करत असल्याचेही तपासात समोर आले आहे.
कारवाईदरम्यान मजहर अब्बास जाफर इराणी याच्याकडून लोखंडी गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. तसेच विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून चोरीस गेलेल्या १६ मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. या टोळीने जळगाव, चाळीसगाव, पाचोरा, चोपडा व अमळनेर येथील १६ गुन्ह्यांची कबुली दिली आहे.
या संपूर्ण कारवाईत पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, राहुल वाघ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली असून, जळगाव पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे गुन्हेगारी टोळीला मोठा धक्का बसल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.




















