जळगाव मिरर | ६ ऑगस्ट २०२५
बांबू लागवडीच्या परवानगीसाठी ३६ हजारांची लाच मागितल्याच्या प्रकरणात वन परिक्षेत्र अधिकारी आणि त्यांचे दोन सहकारी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या जाळ्यात अडकले असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, पारोळा तालुक्यातील सडावण येथे रहिवासी असणाऱ्या व्यक्तीला बांबू लागवड करायची होती. त्याच्या सोबत त्याच्या परिचयातील तिघे अशा चौघांना बांबू लागवडीची परवानगी हवी असल्याने त्यांनी सामाजिक वनीकरण खात्याच्या कार्यालयात संपर्क साधला. येथे आरएफओ मनोज कापुरे यांच्याशी त्यांनी चर्चा केली असता एका फाईलचे प्रत्येकी दहा हजार असे चार फाईल्सच्या चाळीस हजार रूपयांची लाच त्यांना मागण्यात आली. या अनुषंगाने संबंधीत व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली. या तक्रारीची खातरजमा करून आज सापळा रचण्यात आला.
आज तक्रारदाराने पुन्हा आरएफओ कापुरे यांच्याशी संवाद साधला. यात चर्चेअंती 36 हजार रूपयांची लाच देण्यावर एकमत झाले. पंचासमक्ष हा प्रकार झाल्यानंतर लाच स्वीकारतांना त्यांना अटक करण्यात आली. यात वन परिक्षेत्र अधिकारी मनोज बबनराव कापुरे यांच्यासह त्यांच्या कार्यालयातील लिपीक निलेश मोतीलाल चांदणे आणि कंत्राटी कर्मचारी कैलास भरत पाटील या तिघांना एसीबीच्या पथकाने लाच स्वीकारतांना अटक केली असून त्यांच्या विरोधात पारोळा पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.
आजची कारवाई ही एसीबीचे उपअधिक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक हेमंत नागरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
