
जळगाव मिरर | ३ नोव्हेबर २०२५
मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथे पैशाच्या वादातून एका व्यसनी मुलाने स्वतःच्या वडिलांचा खून केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (१ नोव्हेंबर) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. जगदीश दामू तायडे (वय ६०) असे मृत वडिलांचे नाव असून, गणेश जगदीश तायडे (वय २५) हा आरोपी मुलगा आहे. घटनेनंतर पोलिसांनी आरोपीस रविवारी सकाळी अंतुर्ली परिसरातील एका शेतातून अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश हा व्यसनाधीन असून नेहमी वडिलांकडे पैशांची मागणी करीत असे. आंदलवाडी (ता. रावेर) येथील शेतीचे पैसे किंवा बोकड विकून मिळालेली रक्कम देण्याबाबत शनिवारी संध्याकाळी वडील–मुलामध्ये वाद झाला. जगदीश तायडे यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या गणेशने जवळच असलेला लाकडी दांडका उचलून वडिलांच्या डोक्यात वार केले. या मारहाणीमध्ये जगदीश गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी जगदीश यांचा पुतण्या रवींद्र तायडे यांनी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी गणेश तायडे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी सुभाष ढवळे व पोलिस निरीक्षक आशिषकुमार अडसूळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास मुक्ताईनगर पोलिस करत आहेत.





















