जळगाव मिरर | ३ जुलै २०२५
वरणगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत फुलगाव फाट्याजवळील पुलाखाली एका तरुणास गावठी कट्टा व पाच जिवंत काडतुसे बाळगताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. या कारवाईमुळे परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न उधळला गेला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पो.कॉ. रवींद्र चौधरी यांना गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनंतर पो. नि. संदीप पाटील यांच्या आदेशाने पोलीस पथकाने या ठिकाणी धाव घेतली. पंचांसह छापा टाकल्यावर, पोलिसांनी एका संशयित तरुणाला ताब्यात घेतले.
तपासात त्याचे नाव केशव उर्फ सोनू सुनील भालेराव (वय २२, रा. सिद्धेश्वर, वरणगाव, ता. भुसावळ) असे निष्पन्न झाले. त्याची झडती घेतली असता, त्याच्या कमरेला सुमारे २५ हजारांचा गावठी कट्टा व २ हजार ५०० रुपयांचे ५ जिवंत काडतुसे सापडली. त्याच्याकडे शस्त्र बाळगण्याचा परवाना नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्याला वरणगाव पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. या कारवाईमुळे अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्यांवर पोलिसांचे लक्ष असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहणार असल्याचा संदेश देण्यात आला आहे.
