जळगाव मिरर | ९ जानेवारी २०२६
जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून प्रत्येक प्रभागात लढती अधिक चुरशीच्या होत चालल्या आहेत. अशातच प्रभाग क्रमांक १३ ‘ड’ मध्ये अपक्ष उमेदवार जितेंद्र भगवानराव मराठे यांच्या प्रचाराने राजकीय वातावरण तापले आहे. त्यांच्या प्रचाराला नागरिकांकडून मोठा आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने या प्रभागातील प्रस्थापित समीकरणांवर परिणाम होण्याची चर्चा सुरू झाली आहे.
रस्त्यावरील प्रचार, घराघरांत संपर्क आणि स्थानिक प्रश्नांवर थेट भूमिका यामुळे मराठे यांचा प्रचार लक्षवेधी ठरत आहे. प्रचारादरम्यान वाढती गर्दी आणि नागरिकांचा सहभाग पाहता, प्रभागात बदलाची चाहूल लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
दरम्यान, भाजपने नुकतीच जितेंद्र मराठे यांची पक्षातून हक्कालपट्टी केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर काही नागरिकांमध्ये मराठे यांच्याबाबत सहानुभूतीची भावना निर्माण झाल्याची चर्चा असून त्याचा त्यांच्या प्रचारावर सकारात्मक परिणाम होत असल्याचे बोलले जात आहे. प्रभाग १३ ‘ड’ मध्ये यावेळी लढत अधिक तीव्र होत चालली असून अपक्ष उमेदवाराच्या आक्रमक प्रचारामुळे निवडणूक अधिकच रंगतदार झाली आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मतदारांचा कौल नेमका कुणाच्या बाजूने जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




















