जळगाव मिरर । २० जून २०२३
जळगाव शहरातील मुख्य परिसरात असलेल्या महानगर पालिकेच्या इमारतीसमोर दुचाकी दुभाजकावर आदळून जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी रात्री उशिरा शहर पोलिसात नोंद करण्याचे काम सुरु होते. या घटनेमुळे शाहू नगर परिसरावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शाहू नगरातील रहिवासी मिलिंद सोमनाथ पवार(वय ४६) हे मंगळवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घराकडे जात असताना मोटारसायकलने कट मारल्याने त्यांची दुचाकी दुभाजकावर आदळली. याचवेळी दुभाजकावर असलेल्या इलेक्ट्रीक डीपीवर असलेल्या लोखंडी खांबावर कोसळल्याने त्यांना जबरदस्त मार लागला. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात होताच आजुबाजूच्या नागरिकांनी पोलीस स्टेशनला संपर्क करत सदर व्यक्तीस शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, तीन मुली असा परिवार आहे.