जळगाव मिरर | ३ जानेवारी २०२५
जलजीवन योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक घराला स्वच्छ आणि सुरक्षित पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट असून ग्रामीण जनतेला लवकरात लवकर या सुविधांचा लाभ मिळू शकेल यासाठी प्रयत्न करावा. तसेच ग्रामीण भागातील जलजीवन मिशनच्या कामांना गती देऊन कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करावी, असे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज(दि.३ जाने) मंत्रालयात पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या पुढील 100 दिवसाच्या कामाकाजाच्या अनुषंगाने विभागामार्फत 100 दिवसांत करण्यात येणाऱ्या कामांचा आणि कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला त्यावेळी मंत्री गुलाबराव पाटील बोलत होते. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, जलजीवन मिशनचे अभियान संचालक ई.रवींद्रन व विभागाचे मुख्य अभियंता उपस्थित होते.
मंत्री गुलाबराव पाटील पुढे यांनी यावेळी जल जीवन मिशन योजनेअंतर्गत 100 दिवसात करण्यात येणाऱ्या कामाकाजाचा आढावा घेतला. तसेच जल जीवन योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी, स्थानिक स्वराज्य संस्थांनी आणि संबंधित विभागांनी समन्वय साधणे आवश्यक आहे. सर्व संबंधितांनी एकत्रितपणे काम केल्यास, ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करता येईल. भूजल सर्वेक्षणाचा आढावा घेत असतांना कार्यरत नसलेले बोअरवेलचा सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वच्छता विभागामार्फत 100 दिवसांचा कृती आराखड्याचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी शंभर दिवसात गावांमध्ये घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन पायाभूत सुविधा तयार करावीत. दहा हजार गावे हागणदारीमुक्त करण्यासाठी प्रयत्न करावीत. सर्व जिल्ह्यांचे गोबरधन प्रकल्प पूर्ण करावे. प्लॅस्टीक कचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे उद्दीष्टे पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) 2.0 याचा आढावा घेत असतांना यावेळी त्यांनी वैयक्तिक शौचालय बांधकाम, जिल्हानिहाय कचरा संकलन वाहन स्थिती, सांडपाणी व्यवस्थापन, हागणदारी मुक्त गावांची सद्यस्थिती वर्ष निहाय आर्थिक प्रगती, वार्षिक कृती आराखडा आदी विषयाचा आढावा घेतला.