जळगाव मिरर । संदीप महाले
जळगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या जळगाव शहर कार्यालयात आज उमेदवारांच्या मुलाखतींचे आयोजन करण्यात आले. सकाळपासूनच इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. प्रभागनिहाय मुलाखती घेण्यात आल्याने भाजप कार्यालय परिसरात अक्षरशः उमेदवारांचा पाऊस पडल्याचे चित्र होते. सायंकाळी उशिरापर्यंत या मुलाखती सुरू होत्या.
महापालिका निवडणूक ही स्थानिक स्वराज्य संस्थांतील महत्त्वाची निवडणूक मानली जाते. त्यामुळे इच्छुकांनी मोठ्या प्रमाणावर उमेदवारी अर्ज सादर करत पक्षाकडे संधी देण्याची मागणी केली. आजच्या मुलाखतींसाठी शहरातील विविध प्रभागांतून माजी नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, युवक, महिला तसेच नव्या चेहऱ्यांनी हजेरी लावली होती. अनेकांनी आपल्या कार्याचा आढावा, प्रभागातील समस्या, विकासाची दृष्टी व पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी केलेले प्रयत्न याबाबत माहिती दिली.
मंत्री संजय सावकारे, आ.राजूमामा भोळे, माजी महापौर नितीन लढा, दीपक सूर्यवंशी, नितीन इंगळे, राहुल वाघ यांच्या उपस्थितीत ही मुलाखत प्रक्रिया पार पडली. उमेदवारांची सामाजिक प्रतिमा, संघटन कौशल्य, पक्षनिष्ठा, निवडणूक जिंकण्याची क्षमता आणि प्रभागातील जनसंपर्क यावर भर देण्यात आला. तसेच महिला व युवकांना संधी देण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी तळागाळातील कार्यकर्त्यांनाही प्रतिनिधित्व देण्याचा विचार सुरू असल्याचे संकेत यावेळी देण्यात आले.
मुलाखतीदरम्यान उमेदवारांमध्ये उत्साहासोबतच स्पर्धेची तीव्रता दिसून आली. अनेक प्रभागांतून एकाहून अधिक इच्छुक असल्याने अंतिम उमेदवार कोण असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काही प्रभागांत तर दिग्गज नेत्यांसह नवोदित उमेदवारांनीही जोरदार दावा केल्याने पक्ष नेतृत्वासमोर योग्य तोडगा काढण्याचे आव्हान उभे राहिले आहे. भाजप कार्यालय परिसरात दिवसभर चैतन्यमय वातावरण होते. उमेदवारांसोबत कार्यकर्ते, समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय हालचालींना वेग आला असून इतर पक्षांकडूनही उमेदवार चाचपणी सुरू असल्याचे चित्र आहे. जळगाव मनपा निवडणुकीत भाजपकडून जोरदार तयारी सुरू असल्याचे या मुलाखतींमधून स्पष्ट झाले आहे.




















