जळगाव मिरर | २२ जून २०२४
जामनेर येथील पोलिस ठाण्यावर हल्ला करत पोलिसांवर दगडफेक करून वाहनांची तोडफोड करणाऱ्या १५ संशयितांना शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरात ठिकठिकाणी ३०० पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे. पोलिसांनी शुक्रवारी सकाळी रुटमार्चही काढला. छर्रे असलेल्या बंदुकीतून करण्यात आलेल्या गोळीबारात दोन जण जखमी झाले असून यावर राज्याचे मंत्री व जामनेरचे आ.गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मंत्री गिरीश महाजन म्हणाले कि, आपल्या भावनांना आवर घाला, कायदा हातात घेऊ नका….. असे आवाहन त्यांनी द्विटरवर केले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, गुरुवारी रात्री जामनेरात दिसून आलेला जनतेचा आक्रोश आणि संताप रास्त आहे. कोणत्याही संवेदनशील नागरिकाचा संताप अनावर व्हावा असेच कृत्य संबंधित नराधमाने केले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे मी देखील आपल्या इतकाच संतप्त आणि व्यथित आहे. पण माझी सर्वांना नम्र विनंती आहे की, कृपया भावनांना आवर घालावा. कोणीही कायदा हातात घेऊ नये, तपास यंत्रणेला त्यांचे काम करू द्यावे. दोषी व्यक्त्तीला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी, या दृष्टीने काटेकोर तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परिस्थितीवर मी लक्ष ठेवून आहे. संकटग्रस्त परिवाराला आवश्यक ती सर्व मदत तातडीने पुरविण्याचीही सूचना मी प्रशासनाला केली असल्याचे महाजन यांनी द्विट संदेशात म्हटले आहे.