जळगाव मिरर | ८ मार्च २०२५
राज्यातील बीड जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. शिरूर तालुक्यातील बावी गावचे रहिवासी असलेल्या बाप-लेकाला खोक्या उर्फ सतीश भोसले याने बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत वडील दिलीप ढाकणे आणि त्यांचा मुलगा महेश ढाकणे हे गंभीर जखमी झाले होते. दरम्यान या घटनेनंतर आता पोलिसांकडून सतीश भोसलेविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. वनविभाग आणि पोलीसांनी त्यांच्या घराची झाडाझडती घेतली. या झडतीमध्ये पोलिसांच्या हाती काही धक्कादायक गोष्टी लागल्या आहेत.
पोलीस आणि वनविभागाकडून आज खोक्याच्या घराची झाडाझडती घेण्यात आली, समोर आलेल्या माहितीनुसार खोक्याच्या घरामध्ये पोलिसांना वाळलेलं जनावरांचं मांस आणि शिकारीसाठी लागणारं साहित्य आढळून आलं आहे. हे सर्व साहित्य जप्त करण्यात आलं. दरम्यान शिरुर तालुक्यातील नागरिक आता चांगलेच आक्रमक झाले असून, उद्या शिरूर बंदची हाक देण्यात आली आहे.
बावी गावचे रहिवासी दिलिप ढाकणे आणि त्यांचा मुलगा महेश ढाकणे यांच्या रानात सतीश उर्फ खोक्या भोसले याने हरणाची शिकार करण्यासाठी जाळ लावलं होतं. त्यात एक हरण अडकलं. ते हरण सोडवण्यासाठी तिथे ढाकणे कुटुंब पोहोचलं तर त्याने ढाकणे कुटुंबातील वडील आणि मुलाला बेदम मारहाण केली. मुलाचे दात पाडले, वडिलांच्या फासोळ्या मोडल्या. दिलीप ढाकणे यांच्या मुलाचा पाय मोडून तुकडे -तुकडे केले. आम्ही उद्या मोर्चा काढणार आहोत, पोलीस आरोपीला अटक करत नाहीत, नेमकी त्यांना काय अडचण आहे? असा सवाल यावेळी ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
पुढे बोलताना ग्रामस्थ म्हणाले की, खोक्या आणि खोक्याच्या आकावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. खोक्याचे आका आष्टीत आहेत. हे प्रकरण दाबलं जात आहे. कुटुंबाला ब्लॅकमेल करण्यात येत आहे, असा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे. दरम्यान अधिकाऱ्यांकडून माहिती मागवली असून, खातरजमा करून कारवाई होईल अशी माहिती या प्रकरणावर बोलताना गणेश नाईक यांनी दिली आहे.
