जळगाव मिरर | २२ जानेवारी २०२६
मॉर्निंग वॉक करून घरी परतत असलेल्या बांधकाम व्यावसायिकाच्या डोळ्यात स्प्रे मारून मारहाण करत त्यांच्या गळ्यातील सात तोळे वजनाची सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून नेणाऱ्या दोघा तरुणांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. निखील प्रताप सूर्यवंशी (वय २३, रा. पिंपरखेड, ता. चाळीसगाव, ह. मु. गणेश कॉलनी) आणि दीपक प्रकाश बाविस्कर (वय २३, रा. शिवाजी नगर हुडको) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना २३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, बांधकाम व्यावसायिक खुबचंद साहित्या हे ८ जानेवारी रोजी सकाळी पावणेदहाच्या सुमारास मॉर्निंग वॉक करून घरी परतत असताना नयनतारा गेस्ट हाऊससमोर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या डोळ्यात स्प्रे मारला. त्यानंतर त्यांना मारहाण करत गळ्यातील सात तोळे वजनाची सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून पळ काढला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती.
या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी उपनिरीक्षक राहुल तायडे, सहायक फौजदार विजयसिंग पाटील, प्रदीप चौधरी, किरण चौधरी, प्रमोद लाडवंजारी, विशाल कोळी, राहुल घेटे व निलेश पाटील यांच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली. त्यामध्ये दुचाकीवरून आलेल्या दोन इसमांनी साहित्या यांना मारहाण केल्याचे स्पष्ट दिसून आले.
संशयित निखील सूर्यवंशी याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने हा गुन्हा मित्र दीपक बाविस्कर याच्या मदतीने केल्याची कबुली दिली. त्यानंतर बाविस्कर यालाही अटक करण्यात आली. दोघांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना २३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.




















