जळगाव मिरर | २१ जानेवारी २०२६
जळगाव तालुक्यातील कुसुंबे ग्रामपंचायतीने गावात स्मार्ट मीटर बसविण्यास जाहीर विरोध दर्शवित ठराव मंजूर केला आहे. ग्रामस्थांकडून स्मार्ट मीटरबाबत हजारो तक्रारी ग्रामपंचायतीकडे प्राप्त होत असल्याने आज ग्रामसभेत हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला असून तो महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला आहे.
गावात वारंवार वीजपुरवठा खंडित होणे, विजेचा सतत होणारा लपंडाव तसेच अवाजवी वाढीव वीजबिल ही स्मार्ट मीटरविरोधामागील प्रमुख कारणे असल्याचे ग्रामपंचायतीने स्पष्ट केले आहे. याशिवाय संबंधित ठेकेदारांकडील कर्मचारी ग्राहकांना ‘मीटरमध्ये छेडछाड आहे’ अशी भीती दाखवून पैसे उकळत असल्याच्या तक्रारीही समोर आल्याचे ग्रामपंचायतीने नमूद केले आहे.
महावितरणने प्रथम गावातील नवीन ट्रान्सफार्मर बसविणे, जुने वीजखांब व केबल बदलणे तसेच वीजपुरवठा सुरळीत करणे आवश्यक असल्याची मागणी ग्रामपंचायतीच्या ठरावात करण्यात आली आहे. वीजपुरवठ्याच्या मूलभूत सुविधा सक्षम केल्याशिवाय स्मार्ट मीटर बसविणे योग्य नसल्याचा ठाम भूमिका ग्रामपंचायतीने घेतली आहे.
यावेळी सरपंच अशोक पाटील, उपसरपंच चंद्रकांत पाटील तसेच ग्रामपंचायत सदस्य रामदास कोळी, भुषण पाटील, विशाल राणे, प्रमोद घुगे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





















