
जळगाव मिरर | ८ ऑगस्ट २०२५
राज्यातील १५६ पोलीस निरीक्षकांना पोलीस उपअधीक्षक (डीवायएसपी) पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. राज्य शासनाचे सहसचिव व्यंकटेश भट यांनी यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी केले आहेत. या पदोन्नतीच्या निर्णयाकडे राज्यभरातील पोलीस निरीक्षकांचे लक्ष लागून होते. दरम्यान, राज्यातील ३५ पोलीस उपअधीक्षक/सहाय्यक आयुक्तांच्या बदल्याही करण्यात आल्या असून, पाच अधिकाऱ्यांची नव्या जागी पदस्थापना झाली आहे.
या पार्श्वभूमीवर जळगावचे पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत यांची भुसावळ विभागात बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी मालेगावचे पोलीस उपअधीक्षक नितीन गणापूरे यांची नियुक्ती झाली आहे. तर, नाशिक एसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल दिगंबर बडगुजर यांची फैजपूर विभागात पोलीस उपअधीक्षक म्हणून पदोन्नतीवर बदली करण्यात आली आहे. तसेच, पोलीस निरीक्षक सुभाष दादा भोये यांची अक्कलकुवा विभागात तर नाशिक ग्रामीण डीएसबीचे निरीक्षक ज्ञानेश्वर निवृत्ती जाधव यांची धुळे मुख्यालयात पोलीस उपअधीक्षकपदी बदली झाली आहे.




















