
जळगाव मिरर | २९ एप्रिल २०२५
देशातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या यूपीएससी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत अनेक जणांनी यश मिळवले आहे. नांदेड शहरातील कौठा येथील एका लाँड्रीचालकाच्या डॉक्टर मुलाने नागरी सेवेत पदार्पण करत आपल्या आई वडिलांच्या कष्टाचं पांग फेडले आहे. डॉ. शिवराज राजेश गंगावळ अस या तरुणाचे नाव असून एमबीबीएस करून यूपीएसीच्या माध्यमातून यश संपादन केले आहे.
दरम्यान शिवराज गंगावळ यांचे वडील राजेश गंगावळ हे लाँड्रीचा व्यवसाय करायचे. हालकीच्या परिस्थितीत त्यांनी तिन्ही मुलांना शिकवले. मुलांच्या शिक्षणासाठी राजेश गंगावळ हे अथक प्रयत्न करायचे. त्यांच्या या कष्टाचे चीज करत शिवराज यांनी एमबीबीएसच शिक्षण पूर्ण केले. डॉ.शिवराज यांचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण नांदेड शहरातील प्रतिभानिकेतन हायस्कूल, बारावीचे शिक्षण यशवंत महाविद्यालयातून तर वैद्यकीय शिक्षण कोल्हापूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून पूर्ण केले. डॉ. शिवराज गंगावळ हे सध्या मुखेड तालुक्यातील बारहाळी येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
डॉ. शिवराज यांनी घरची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी एमबीबीएसनंतर शासकीय नोकरी स्वीकारली असली तरी पूर्वीपासून आपले ध्येय यूपीएससी होती. हा प्रवास सोपा नव्हता. सलग चार वेळा या परीक्षेत अपयश आले. पाचव्या प्रयत्नात मुख्य परीक्षेसह मौखिकपर्यंत मजल मारली; परंतु यश काही आले नाही. सहाव्यांदा पुन्हा जोमाने तयारी करून यश मिळविले. यूपीएससी ही मॅरेथॉन असून विजय मिळेपर्यंत संपूर्ण ताकदीनीशी तयारी केली पाहिजे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.