जळगाव मिरर | ४ सप्टेंबर २०२५
मध्यप्रदेशातून छत्रपती संभाजीनगरकडे अवैधरित्या वाहतुक होणाऱ्या गुटख्याच्या वाहनावर मुक्ताईनगर तालुक्यातील सारोळा फाटा येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली. या वाहनातून सुमारे १ कोटी २ लाख ३३ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला असून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी सकाळच्या सुमारास झालेल्या या कारवाईमुळे अवैध धंदे चालकांमध्ये खळबळ माजून गेली आहे.
राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची मध्यप्रदेशातून अवैधरित्या छत्रपती संभाजीनगरकडे वाहतुक होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळाली. त्यांनी उपनिरीक्षक सोपान गोरे, पोहेकॉ सलीम तडवी, छगन तायडे, रतन गिते, मयूर निकम, भरत पाटील यांचे पथक तयार करीत कारवाईसाठी रवाना केले. या पथकाने मुक्ताईनगर तालुक्यातील सारोळा फाटा येथे नाकाबंदी करुन सापळा रचला होता. गुटखा वाहतुक करणारा वाहन हे सारोळा फाट्यावर येताच पथकाने वाहन थांबवून कारवाई केली. या कारवाईत राज्यात प्रतिबंधित असलेला १ कोटी २ लाख ३३ हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. ायप्रकरणी गुटख्याची वाहतुक करणाऱ्या आशिष राजकुमार जयस्वाल (रा. भमोरी देवास, मध्यप्रदेश) व आशिफ खान बुल्ला खान (रा. शिवशक्ती नगर, नागपुर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मध्यप्रदेशातून निघालेला गुटख्याचा ट्रक हा जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरमार्गे छत्रपती संभाजी नगरकडे जाण्यासाठी निघाला होता. मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या ट्रकवर कारवाई करीत सुमारे १ कोटी २ लाखांचा गुटखा जप्त केला. या कारवाईमुळे अवैध गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ माजून गेली आहे.