जळगाव मिरर | ५ डिसेंबर २०२५
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात पुन्हा एकदा बिबट्याचा दहशतवाद समोर आला आहे. रात्रीच्या अंधारात मोबाईलवर बोलत उभ्या असलेल्या 18 वर्षीय तरुणावर बिबट्याने जीवघेणा हल्ला केला. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला असून सध्या त्याच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जखमी तरुणाचे नाव तनिष नवनाथ परदेशी (18) असे आहे. तो शुक्रवारी रात्री सुमारास नारायणगाव–जुन्नर रस्त्यालगतच्या साकार नगरी सोसायटीजवळ मोबाईलवर बोलत उभा होता. मोबाईलवरील संभाषणात तो इतका गुंग झाला की, त्याच्या मागून दबक्या पावलांनी आलेल्या बिबट्याची चाहूलही त्याला लागली नाही. अचानक बिबट्याने तनिषच्या अंगावर झेप घेत त्याच्या पायावर आणि अंगावर मोठे ओरखडे उमटवले.
आरडाओरड केल्याने बिबट्या अंधारात पसार झाला. जखमी तनिषला तातडीने नारायणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्या पोटरीला गंभीर इजा झाल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. ड्रोनच्या साहाय्याने परिसरात पाहणी करण्यात आली असता, वारुळवाडीतील मीनाक्षी कृपा वसतीगृहाच्या परिसरात एक नव्हे तर तीन बिबटे आढळले. हे ठिकाण हल्ल्याच्या ठिकाणापासून अवघ्या 200 फूटांवर असल्याने नागरिक व विद्यार्थ्यांमध्ये भीती वाढली आहे.
विशेष म्हणजे, तनिषवर हल्ला होण्याच्या केवळ एक दिवस आधी याच भागात बिबट्याने चार पाळीव प्राण्यांचा बळी घेतला होता. वाढत्या हालचालींमुळे वन विभागाने या परिसरात 8 पिंजरे लावले असून रात्री नागरिकांनी मुक्त संचार टाळावा, तसेच बिबट्या दिसल्यास तातडीने वन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.




















