जळगाव मिरर | १८ सप्टेंबर २०२३
जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील गुढे व पथराड शिवारात बिबट्याने दोन बोकड फस्त केले असून या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. गेल्या काही दिवसापासून या परिसरात बिबट्याची मोठी दहशत आहे.
गेल्या काही दिवसापासून गुढे, जुवार्डी, पथराड, कोळगाव, वाडे, नावरे परिसरात बिबट्याचा मुक्त संचार सुरू असून आतापर्यंत बिबट्याने अनेक पाळीव प्राण्यांवर हल्ला करून ठार केले आहे. परंतु आतापर्यंत वनविभागाला हा बिबट्या जेरबंद करण्यास पूर्णतः अपयश आले आहे. गेल्या महिन्यामध्ये याच बिबट्याने गुढे येथील लवण शिवारामध्ये सुभाष भिवसन माळी यांचे शेडमध्ये बांधलेले वासरू फस्त केले होते. आता या बिबट्याने कोळगाव, पथराड फाटा येथे असलेल्या गुढे येथील शेतकरी दीपक दिलीप माळी यांच्या शेडमध्ये बांधलेले १५ हजार किमतीचे दोन बोकड तसेच शेळ्यांवर हल्ला करून दोन्ही लहान बोकडांना फस्त केले आहे.
एका बोकडाला उचलून नेत लिंबूच्या शेतामध्ये फस्त केले. संबंधित शेतकऱ्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना फोनवरून घटनेची माहिती दिली असता वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून पंचनामा करून घ्यावा, असा सल्ला दिला. या बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, या मागणीसाठी प्रहारचे भडगाव तालुकाध्यक्ष हिम्मत सुदाम माळी यांनी या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.