
जळगाव मिरर | २८ जुलै २०२५
“प्रेम आंधळं असतं” अशी जुनी म्हण आहे, पण पुण्यातील एका प्रेमीयुगुलाने या म्हणीचा अर्थ अक्षरशः करून दाखवला आहे. खेड-शिवापूर मार्गावरील शिंदेवाडी परिसरात धावत्या दुचाकीवर प्रेमाच्या नशेत मश्गुल असलेल्या या जोडप्याचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. यामुळे पुणेकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
या व्हिडीओमध्ये दिसून येते की, एक तरुण दुचाकी चालवत आहे, तर त्याच्या समोरच्या पेट्रोल टँकवर उलटी बसलेली तरुणी त्याला घट्ट मिठी मारून बसलेली आहे. तिचा चेहरा स्कार्फने झाकलेला असला तरी तिची आणि तरुणाची जवळीक स्पष्टपणे दिसून येते. वाहनधारक रस्त्यावरून जात असताना ही दृश्ये पाहून चक्रावले आणि काहींनी या प्रकाराचा व्हिडीओ काढून सोशल मीडियावर शेअर केला.
या धोकादायक कृतीमुळे ना केवळ त्यांच्या स्वतःच्या जीवाला, तर इतर वाहनचालकांच्या सुरक्षेलाही धोका निर्माण झाला. काही सेकंदांचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. “पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात अशा घटना घडणं लाजिरवाणं आहे,” असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. काहींनी “हा प्रेमाचा आविष्कार आहे की बेजबाबदारीचा कळस?” असा सवालही उपस्थित केला आहे.
या घटनेची दखल घेत पुणे पोलिसांनी तत्काळ हालचाली सुरू केल्या आहेत. व्हिडीओच्या आधारे संबंधित तरुण आणि तरुणीची ओळख पटवण्याचे काम सुरु असून, वाहतूक नियमांचे उल्लंघन, सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन आणि जीव धोक्यात घालणाऱ्या स्टंटप्रमाणे कृत्य केल्याच्या आरोपांखाली त्यांच्यावर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.
या प्रकरणामुळे पुण्यातील सार्वजनिक सुरक्षेचा मुद्दा आणि काही तरुणांच्या बेजबाबदार वर्तनाबाबत चिंतेचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्रेम व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य असले तरी, ते सामाजिक नियम आणि सार्वजनिक सुरक्षेच्या चौकटीत राहूनच व्यक्त करणे आवश्यक आहे, ही बाब लक्षात घेण्याची वेळ आता आली आहे.




















