जळगाव मिरर | २२ जुलै २०२५
गेल्या आठवड्यापासून राज्यात हनी ट्रॅप प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून या हनी ट्रॅप प्रकरणी प्रफुल लोढा नावाच्या व्यक्तीवर मुंबईतील अंधेरी एमआयडीसी आणि साकीनाका पोलिस ठाण्यांमध्ये अल्पवयीन मुलींवर अत्याचार प्रकरणात गुन्हे दाखल झाले आहेत. आता लोढाचे पुण्यातील काळेकारनामे उघड समोर आले आहेत.
आता लोढा याच्यावर पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील बावधन पोलिस ठाण्यात आणखी एक गंभीर गुन्हा नोंद झाला आहे. यामुळे आता लोढाच्या अडचणी वाढणार आहेत. या तक्रारीच्या आधारावर बावधन पोलिसांनी बलात्कार व धमकी देण्याचे गुन्हे नोंद केले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. पोलिसांकडून आरोपीचा ताबा घेण्याची प्रक्रिया होणार असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल विभुते यांनी सांगितले.
दरम्यान, १७ जुलै रोजी कोथरूडमध्ये राहणाऱ्या एका ३६ वर्षीय महिलेने बावधन पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. तिने दिलेल्या तक्रारीनुसार २७ मे २०२५ रोजी रात्री लोढा याने तिला पतीसाठी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवण्याची अट घातली होती, असा आरोप करण्यात आला आहे. पीडित महिलेने नकार दिल्यानंतर त्याने तिची देखील नोकरी घालवण्याची धमकी दिली व जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार केला असा गंभीर आरोप ठेवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३ जुलै रोजी साकीनाका पोलिस ठाण्यात प्रफुल्ल लोढा याच्यावर १६ वर्षीय मुलीसह तिच्या मैत्रिणीवर नोकरीचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार, धमकी आणि अश्लिल फोटो प्रकरणी पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर १४ जुलै रोजी अंधेरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात देखील ‘हनी ट्रॅप’च्या प्रकाराशी संबंधित गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आहे. ५ जुलै रोजी मुंबई पोलिसांनी प्रफुल्ल लोढा याला अटक केली आहे.
