जळगाव मिरर | २८ जानेवारी २०२६
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अभ्यासू, स्पष्टवक्ते नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे अजितदादा पवार यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारे असल्याची भावना भाजपाच्या जिल्हा सरचिटणीस डॉ. केतकी पाटील यांनी व्यक्त केली आहे. भल्या पहाटे अशी दुःखद बातमी महाराष्ट्राला ऐकावी लागेल, याची कल्पनाही कुणाला नव्हती. या घटनेमुळे संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाले असल्याचे त्यांनी सांगितले.
अजितदादा पवार हे तरुण कार्यकर्त्यांसाठी कायमच आधारवड होते. कार्यकर्त्यांवर निस्सीम प्रेम करणारे, त्यांना मार्गदर्शन करणारे आणि संधी देणारे नेतृत्व म्हणून दादांची ओळख होती. तरुणांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलपणे पाहणारे आणि त्यांना पुढे नेण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन देणारे व्यक्तिमत्त्व आज हरपल्याची खंत डॉ. पाटील यांनी व्यक्त केली.
राज्याचा अर्थसंकल्प सर्वाधिक वेळा मांडण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. अर्थ व नियोजन मंत्री म्हणून त्यांनी राज्याच्या आर्थिक शिस्तीला दिशा दिली. प्रशासनावर पकड, बारकाईने काम करण्याची शैली आणि निर्णयक्षमता यामुळे ते एक अभ्यासू व प्रभावी नेते म्हणून ओळखले जात होते. स्पष्टवक्तेपणा, निडर भूमिका आणि प्रचंड निर्णयक्षमता हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे ठळक गुण होते.
अजितदादांच्या अकाली जाण्याने केवळ एक ज्येष्ठ नेता नाही तर तरुण कार्यकर्त्यांचा आधारस्तंभच कोसळला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाची आणि नेतृत्वाची उणीव कायम जाणवत राहील, अशा शब्दांत डॉ. केतकी पाटील यांनी अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.




















