जळगाव मिरर | ६ ऑगस्ट २०२५
राज्यातील बहुचर्चित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मोठा गोंधळ उघडकीस आला आहे. माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या तपासणीत तब्बल २६ लाख ३४ हजार महिलांचा लाभ संशयास्पद ठरला आहे. त्यामुळे आता या महिलांची घरोघरी जाऊन पडताळणी सुरू करण्यात आली आहे.
आजपासून (६ ऑगस्ट) अंगणवाडी सेविका या संशयित लाभार्थींच्या घरी भेट देऊन पात्रता तपासत आहेत. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यासंदर्भात माहिती दिली.
राज्य सरकारकडून या योजनेसाठी एकूण २ कोटी ५९ लाख अर्ज प्राप्त झाले होते. निवडणुकीपूर्वी सरकारने महिलांच्या खात्यात दर महिन्याला १,५०० रुपये थेट जमा करण्यास सुरुवात केली होती. मात्र, निवडणुकीनंतर अर्जांची सखोल तपासणी करण्यात येत आहे, आणि त्यात अनेक अपात्र लाभार्थ्यांचे प्रकार समोर येत आहेत.
अपात्रतेची प्रमुख कारणे: २१ ते ६५ वयोगटाच्या बाहेरील महिलांनी लाभ घेतला. (फक्त सोलापूर जिल्ह्यातच २६,०७८ प्रकरणे) एकाच कुटुंबातील ३ किंवा अधिक महिलांनी लाभ घेतल्याची ८३,७२२ प्रकरणे पुरुष लाभार्थींचाही धक्कादायक प्रकार उघड
सरकारने स्पष्ट केलं आहे की, निकषांचे उल्लंघन करणाऱ्यांचे लाभ तत्काळ बंद करण्यात येतील आणि त्यांनी घेतलेली रक्कम परत वसूल केली जाईल. या पार्श्वभूमीवर, योजनेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, प्रशासनाकडून कारवाईला वेग दिला जात आहे.
