जळगाव मिरर/१८ डिसेंबर २०२५
राज्यातील भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांचे विश्वासू शिलेदार अरविंद देशमुख यांच्या मातोश्री श्रीमती सुशीला भगवान देशमुख यांचा ८५ वा वाढदिवस नुकताच अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात साजरा झाला.
या प्रसंगी सुशीला आईंनी अरविंद देशमुख यांना एक मोलाचा विचार दिला. “सामाजिक व राजकीय कार्य करत असताना अध्यात्माकडे कधीही दुर्लक्ष करू नकोस,” असा स्नेहपूर्ण सल्ला आईने दिला. आईच्या या शब्दांना मान देत अरविंद देशमुख यांनी तात्काळ शब्द दिला की, आपण ज्या परिसरात राहतो त्या परिसरातील माता-भगिनींना आईच्या रूपात शेगाव श्री गजानन महाराजांची वारी घडवून आणू.
आईला दिलेल्या शब्दाची अंमलबजावणी करत आज आपल्या परिसरातील माता-भगिनींना शेगाव दर्शनाची वारी घडवून आणली. या भक्तिमय यात्रेमुळे परिसरात आनंद, समाधान आणि अध्यात्मिक वातावरण निर्माण झाले.आपल्या मनोगतात अरविंद देशमुख यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “मी माता आणि माती — या दोघांशीही कधीच प्रतारणा करणार नाही.” त्यांच्या या भावनिक भूमिकेला उपस्थितांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमात हरिभक्त परायण जळकेकर महाराज यांनी आपल्या प्रवचनातून देव, देश, धर्म, माता आणि माती यांचा सुंदर समन्वय साधत उपस्थित भगिनींच्या डोळ्यात अश्रू आणले. त्यांच्या ओघवत्या आणि हृदयस्पर्शी वाणीने सर्वजण मंत्रमुग्ध झाले.
शेगाव वारीहून परतताना वाहनात बसत असताना उपस्थित महिलांनी अरविंद देशमुख यांच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवत, “तू खरंच एक आदर्श मुलगा आहेस,” असे म्हणत मनापासून आशीर्वाद दिले. हा क्षण उपस्थित सर्वांसाठी भावनिक आणि प्रेरणादायी ठरला.आईच्या विचारातून जन्मलेली ही शेगाव वारी सामाजिक, धार्मिक आणि संस्कारांची जाणीव करून देणारी ठरली असून, समाजात सकारात्मक संदेश देणारा हा उपक्रम म्हणून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.




















