
जळगाव मिरर | २५ मार्च २०२६
भोंदू बाबा म्हणून चर्चेत असलेल्या अशोक खरात प्रकरणावरून राज्यातील राजकारण अधिकच तापले असून, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर आणि खळबळजनक आरोप केले आहेत. मुख्यमंत्री होण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी अशोक खरात याच्याकडे जाऊन अघोरी पूजा केल्याचा दावा सपकाळ यांनी केला आहे.
अशोक खरातच्या कथित कारनाम्यांमुळे राज्यातील राजकीय वातावरण आधीच ढवळून निघाले आहे. विविध नेते आणि अधिकाऱ्यांशी त्याचे संबंध असल्याचे आरोप होत आहेत. या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागल्याने प्रकरण अधिकच गाजले.
सपकाळ यांनी आपल्या वक्तव्यात म्हटले की, “सरकारने जर अशोक खरात प्रकरणात प्रामाणिकपणे कारवाई केली, तर डझनभर मंत्री आणि दोन डझन अधिकारी तुरुंगात जातील.” त्यांनी भाजपवर थेट निशाणा साधत या प्रकरणात मोठ्या प्रमाणावर साटेलोटे असल्याचा आरोप केला.
तसेच, खरातच्या इशानेश्वर मंदिराला देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने २०१८ साली दीड कोटी रुपयांचा निधी दिल्याचाही उल्लेख सपकाळ यांनी केला. त्या काळात फडणवीसांच्या कार्यालयात कार्यरत असलेले अधिकारी मिलिंद बोरीकर यांचेही खरातशी निकटचे संबंध असल्याचा आरोप त्यांनी केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचेही खरातसोबतचे फोटो समोर आल्याचे त्यांनी नमूद केले.
चंद्रकांत पाटील यांच्यावर आरोप करताना सपकाळ म्हणाले, “त्यांचेही या भोंदू बाबाशी अत्यंत जवळचे संबंध होते. मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांनी अघोरी पूजा केल्याची माहिती मिळत आहे.”
याचबरोबर त्यांनी असा दावा केला की, भोंदू बाबा अशोक खरात याचे कारनामे देवेंद्र फडणवीस यांना मागील सहा महिन्यांपासून माहित होते. मात्र, त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांचे आणि मंत्रिमंडळातील सदस्यांचे खरातशी संबंध असल्याने कारवाई टाळण्यात आली.
पुढे त्यांनी आरोप केला की, फडणवीस यांच्या मित्रपक्षातील काही सहकाऱ्यांनी त्यांचे मुख्यमंत्रीपद डळमळीत करण्यासाठी खरातकडून तंत्र-मंत्र आणि अघोरी पूजांचा आधार घेतला. त्यानंतरच फडणवीस यांनी खरातविरोधात कारवाई सुरू केली आणि आता ते या प्रकरणाचा वापर करून मित्रपक्ष व पक्षातील विरोधकांवर दबाव टाकत आहेत.
दरम्यान, सपकाळ यांनी राष्ट्रीय मुद्द्यावरूनही भाजपवर हल्लाबोल केला. देशातील इंधन संकटाचा उल्लेख करत त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. “देश गंभीर संकटात असताना सरकार निष्क्रिय आहे. पंतप्रधानांनी राजीनामा देऊन जनतेला त्रासातून मुक्त करावे,” अशी मागणी त्यांनी केली. या सर्व आरोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापण्याची चिन्हे असून, भाजपकडून यावर काय प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




















