जळगाव मिरर | २ ऑगस्ट २०२५
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मराठी अस्मितेचा मुद्दा उचलून धरत गुजरात आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. पुण्यात आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी म्हटलं की, “महाराष्ट्राच्या हक्कावर गदा येणार असेल, तर आम्ही शांत बसणार नाही. कुणी काहीही म्हटलं, तरी मराठी भाषा, संस्कृती आणि भूमी यासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही.”
राज ठाकरे यांनी आरोप केला की, महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांमध्ये कृत्रिम दुही निर्माण करून काही जण राजकीय फायदा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. “महाराष्ट्राला नख लागतंय हे समजल्यावर आम्ही अंगावर आल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला हवं तेच आम्ही करणार,” अशा शब्दांत त्यांनी इशारा दिला.
राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील अनेक औद्योगिक प्रकल्प गुजरातकडे स्थलांतरित झाल्याचं मुद्दाम नमूद केलं. “पुण्यातील अनेक मोठे प्रकल्प गुजरातला गेले. हे नुसते योगायोग नाहीत. हे मुद्दाम घडवून आणलं जातं आहे. केंद्र सरकारमधील गुजरातचे प्रभावी नेते हे त्यांच्या राज्यासाठी निर्णय घेतात. मग आम्ही आमच्या राज्याचा विचार करणे चुकीचं कसं?” असा प्रतिप्रश्न ठाकरे यांनी उपस्थित केला.
राज ठाकरे यांनी गुजरातमध्ये परप्रांतीय कामगारांवर झालेल्या हल्ल्यांचा उल्लेख करत केंद्र सरकारवर दुहेरी भूमिकेचा आरोप केला. “गुजरातमध्ये दोन वेळा बिहारी मजुरांना हाकलण्यात आलं. पहिल्यांदा तब्बल २० हजार लोकांना बाहेर काढण्यात आलं. त्यावेळी अल्पेश ठाकूर यांनी बिहारींविरोधात मोहीमच राबवली. पण त्या बातम्या चर्चेत येत नाहीत,” असं सांगत त्यांनी माध्यमांच्या भूमिकेवरही सवाल उपस्थित केला.
आपल्या भूमिकेवर टीका करणाऱ्यांना उत्तर देताना ठाकरे म्हणाले, “मी जर मराठी माणसासाठी बोललो, तर मला संकुचित म्हटलं जातं. पण इतर कोणी त्यांच्या राज्याच्या हितासाठी बोललं, तर त्यांना प्रगतीशील म्हणतात. ही भूमिका चुकीची आहे. आम्ही आमच्या मातृभूमीच्या हितासाठीच लढतो.”
मनसे प्रमुखांनी महायुती सरकारमधील नेत्यांनाही लक्ष्य केलं. “गिरीश महाजन यांचे सहकारी असलेल्या भुसेंनाही मी स्पष्ट सांगितलं – मराठीसाठी कोणतीही तडजोड मान्य नाही. सरकार कोणाचंही असो, आमचा मुद्दा मराठी अस्मिता आणि जनतेचा हक्क आहे,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं.
