जळगाव मिरर | २८ जानेवारी २०२६
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा धडाडीचे, स्पष्टवक्ते नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनाचे वृत्त संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारे असल्याची भावना माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी व्यक्त केली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असून राज्याच्या राजकारणात भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे, असे त्यांनी आपल्या शोकसंदेशात नमूद केले.
अजित पवार हे गेल्या चार दशकांपासून राज्याच्या राजकारणावर ठसा उमटवणारे नेतृत्व होते. स्पष्ट भूमिका, धडाडीचे निर्णय आणि प्रशासनावर असलेली मजबूत पकड ही त्यांची ओळख होती. सकाळी सहा वाजता सर्वसामान्य नागरिकांना भेटणारा नेता म्हणून ते ओळखले जात होते. लोकांशी थेट संवाद साधणे, त्यांच्या अडचणी ऐकून तत्काळ निर्णय घेणे ही त्यांच्या कार्यपद्धतीची खासियत असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.
विविध राजकीय कार्यक्रमांच्या निमित्ताने अजितदादांची भेट होत असताना जळगाव जिल्ह्यातील शेती आणि सहकार क्षेत्राविषयी ते आवर्जून माहिती घेत असत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत त्यांना विशेष आस्था होती. शेतकऱ्यांसाठी काढलेल्या संघर्ष यात्रेचे नेतृत्व त्यांनी केले होते आणि शेतकरी हितासाठी त्यांनी घेतलेले निर्णय कायम स्मरणात राहतील, असेही डॉ. पाटील यांनी नमूद केले.
अजितदादांच्या अकाली निधनाचे वृत्त मनाला चटका लावणारे असून त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. दादांसारखे धडाडीचे आणि लोकाभिमुख नेतृत्व पुन्हा होणे नाही, अशा शब्दांत डॉ. उल्हास पाटील यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.





















