अलिबाग : वृत्तसंस्था
अतिशय वाईट बातमी समोर आली आहे. भारतीय सैन्यातील जवानाला देशाचं रक्षण करताना वीरमरण आलं आहे. जवान राहुल भगत यांना वीरमरण आलं आहे. राहुल भगत हे अवघ्या 26 वर्षांचे होते. राहुल भगत रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यामधील इसाने कांबळे गावाचे रहिवासी होते. राहुल भगत यांच्या पश्चात आई वडील, भाऊ , पत्नी आणि 1 मुलगा असा परिवार आहे. राहुल भगत यांचे कुटुंब (पत्नी आणि मुलगा) ठाण्यात राहते तर आई वडील व भाऊ हे इसाने कांबळे गावात राहतात.
राहुल भगत जम्मूतील बारामुल्ला इथे सीमेचे रक्षण करताना त्यांना वीरमरण आलं. आपल्या गावातील जवानाला वीरमरण आल्याने गावावर शोककळा पसरली आहे. राहुल भगत यांचा जन्म 10 मार्च 1996 रोजी झाला होता. राहुल भगत वयाच्या 19 व्या वर्षी सैन्यदलात भरती झाले होते. भगत कुटुंबिय हे मुळचे मु.पो.पिंपळदरी, ता.औढा नागनाथ, जि.हिंगोली इथले आहेत. मात्र भगत कुटुंबिय महाड या गावी सन 1980 पासून राहतात. राहुल भगत यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.