जळगाव मिरर । १५ ऑक्टोबर २०२५
शहरातील ग्राहक न्यायालयाच्या शासकीय इमारतीच्या परिसरातील रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम झाल्याची गंभीर तक्रार सामाजिक कार्यकर्ते गजानन पुंडलिक मालपुरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. या तक्रारीत त्यांनी रस्त्याचे काम तांत्रिक निकषांना फाटा देऊन केल्याचा ठपका ठेवला असून, संबंधित ठेकेदारासह कार्यक्षेत्रीय अधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी केली आहे.
गजानन मालपुरे यांनी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, जळगाव यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ग्राहक न्यायालयाच्या परिसरातील नव्याने केलेला रस्ता अवघ्या दोन-तीन महिन्यांतच खराब झाला आहे. रस्त्यावर तडे गेले असून, ठिकठिकाणी खच पडले आहेत. हे काम पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे असून, कोणत्याही तांत्रिक निकषांचे पालन न करता ते केले गेले आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. या खराब रस्त्यावर ठेकेदार व अधिकाऱ्यांनी संगनमताने सिमेंट पाणी टाकून तडे बुजवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र ही डागडुजी केवळ तात्पुरती आहे आणि त्याने समस्या अधिक वाढली आहे. सदर रस्त्याचे बांधकाम शासकीय निविदेनुसार व निकषांनुसार झालेले नाही, असा ठपका त्यांनी ठेवला आहे.
या प्रकरणी मालपुरे यांनी संबंधित ठेकेदारावर कारवाई करून त्याला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी केली आहे. तसेच, या कामामागे संबंधित कार्यक्षेत्रीय अधिकारी देखील तेवढेच जबाबदार असल्यामुळे त्यांच्यावरही चौकशी करून शिस्तभंगात्मक कारवाई करण्यात यावी, असे निवेदनात नमूद आहे. मालपुरे यांनी आपल्या निवेदनात, सदर तक्रारीवर कोणती कारवाई करण्यात आली याची प्रत लेखी स्वरूपात देण्यात यावी, अशी स्पष्ट मागणी केली आहे.