जळगाव मिरर | ३० ऑक्टोबर २०२५
गेल्या वर्षी अभिनेत्रीपासून साध्वी बनलेली ममता कुलकर्णी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आता पुन्हा एकदा ममता कुलकर्णी ही चर्चेत आली आहे. यावेळी तिने चक्क दाऊद इब्राहिमचे नाव घेऊन धक्कादायक विधान केले आहे. गोरखपूरमध्ये माध्यमांशी बोलताना ममता कुलकर्णीने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे नाव घेताना, तो दहशतवादी नसल्याचे जाहीर केले.
ममता कुलकर्णी मुंबई बॉमस्फोटाविषयी बोलताना,” त्याचे (दाऊद इब्राहिम) नाव बॉम्बस्फोटासारख्या कोणत्याही कटात कधीही सामील नव्हते. मीडिया आणि काही राजकीय शक्तींनी वर्षानुवर्षे दाऊदचे चुकीचे वर्णन केले आहे.” असे म्हणत वादग्रस्त विधान केले आहे.त्यासोबतच तिने दाऊद इब्राहिम हा दहशतवादी नसल्याचेही धक्कादायक विधान करून नवा वाद निर्माण केला आहे. दरम्यान, ममता बाबा गोरखनाथांचे आशीर्वाद घेण्यासाठी आणि प्रार्थना करण्यासाठी गोरखनाथ मंदिरात गेली होती. त्यानंतर माध्यमांशी बोलताना तिने हे विधान केले. ९० च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीतील तिच्या धाडसी भूमिका आणि हिट चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेली ममता आता आध्यात्मिक जीवन जगत आहे.
प्रयागराज महाकुंभातील किन्नर आखाड्यातील महामंडलेश्वर पदासाठी उमेदवारी मिळाल्यामुळे ममता कुलकर्णी चर्चेत होती. मात्र, नंतर तिने या पदाचा राजीनामा दिला. दोनच दिवसांनंतर, तिला महामंडलेश्वर म्हणून पुन्हा नियुक्त करण्यात आले. तिने तिच्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ममता कुलकर्णीचे नाव आता यमाई ममता नंद गिरी झाले आहे. ममता यांनी याविषयी बोलताना, “मला या पदावर पुन्हा नियुक्त केल्याबद्दल मी माझ्या गुरूंची आभारी आहे. मी माझे जीवन किन्नर आखाडा आणि सनातन धर्मासाठी समर्पित करेन.” असे म्हटले आहे.
बॉलीवूड सोडल्यानंतर ममता दुबईत राहत होती. गेल्या वर्षीच्या अखेरीस, ती २५ वर्षांनंतर दुबईहून भारतात परतली. त्यानंतर तिने निवृत्तीची घोषणा केली. प्रयागराज महाकुंभादरम्यान, तिने किन्नर आखाड्यातून दीक्षा घेतली आणि ती संन्यासी बनली. तिचे पिंडदान आणि पट्टाभिषेक महामंडलेश्वर डॉ. लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी केले. तिला महामंडलेश्वर पद देण्यात आले. तथापि, काही दिवसांतच तिला विरोध झाला आणि तिने राजीनामा दिला. नंतर तिने हे पद परत मिळवले.

 
			

















