जळगाव मिरर | २३ जुलै २०२५
गेल्या काही दिवसापासून राज्यातील मराठी-हिंदी वाद सुरु असतांना आता कल्याण-मलंगगड रोडला नांदिवली-आडिवली गावच्या एका रुग्णालयात सोमवारी संध्याकाळी मराठी रिसेप्शनिस्ट तरुणीला एका परप्रांतीयाने बेदम मारहाण केली होती. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून आज दुपारी बारानंतर त्यांना न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे. यातील एका हल्लेखोराचे गोकुळ झा असे नाव असून पोलिसांनी त्याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कायद्यान्वये मारहाण, विनयभंग, आदी कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.
सोमवारी संध्याकाळी सहा वाजल्यापासून रुग्ण व सोबतच्या नातेवाईकांची गर्दी होती. सारेच रूग्ण डॉक्टरांच्या प्रतीक्षेत होते. संध्याकाळी साडेसहा वाजता डॉक्टर आल्यानंतर काही औषध विक्रेते प्रतिनिधी सर्वांच्या आधी डॉक्टरांना भेटण्यास केबिनमध्ये गेले. डॉक्टरांच्या सूचनेप्रमाणे कुणाला केबिनमध्ये सोडायचे हे काम स्वागतकक्षात बसलेली तरुणी करत होती. केबिनमध्ये डॉक्टर आणि औषध विक्रेते प्रतिनिधी असतानाच झा आपल्या बाळासोबत आल्या होत्या. त्यांच्या सोबत एक २५ वर्षाचा तरुण होता. झा आपल्या बाळाला घेऊन त्या तरुणासह डॉक्टरांच्या केबिनमध्ये घुसायला लागले. मात्र तरुणीने त्यांना थांबवले. सर्व एमआर बाहेर आले की तुम्हाला मी तुम्हाला आत सोडते, असे तिने झा आणि तिच्या सोबतच्या तरुणाला सांगताच तरुणाने रिसेप्शनिस्टला अश्लिल भाषेत शिवीगाळ केली. केबिनमध्ये बसलेल्यांना आधी बाहेर काढ, आम्हाला आत जायचे आहे, असे धमकावून तो तरुण स्वागतकक्षाच्या बाजूला गेला. काही वेळाने तो पुन्हा स्वागत कक्षात आला आणि काही कळायच्या आत त्या तरुणीच्या छातीवर जोरात लाथ मारली. त्यानंतर केस पकडून तिला आपटले. हल्लेखोराने तरुणीला मारहाण सुरू करताच अन्य रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी मधे पडून हल्लेखोर गोकुळ झा याच्या तावडीतून तरुणीची सुटका केली.
या घटनेनंतर गोकुळ झा पळून गेला होता. पोलीस त्याचा कसोशीने शोध घेत होते. अखेर मंगळवारी रात्री पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून हॉस्पिटलमध्ये उपस्थित असलेल्या इतर व्यक्तींची चौकशी करणार आहेत. दरम्यान, आरोपींना आज दुपारी बारानंतर न्यायालयात हजर केले जाणार आहे.
