
जळगाव मिरर | २८ मार्च २०२६
पाचोरा तालुक्यातील एका गावात २४ वर्षीय विवाहितेचा रस्त्यावर विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या प्रकरणी दोन संशयित आरोपींविरुद्ध पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला आपल्या कुटुंबासह गावात वास्तव्यास आहे. दिनांक २७ मार्च रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजेच्या सुमारास ती आपल्या जेठानीसोबत शौचालयाकडे जात असताना ही घटना घडली. त्यावेळी दोन संशयित आरोपींनी दुचाकी आडवी लावून महिलेला अडवले. यानंतर आरोपींनी महिलेकडे अश्लील मागणी करत तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याच वेळी महिलेच्या पतीने विरोध केल्यावर आरोपींनी त्याला चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली तसेच “तुमच्याने जे होईल ते करून घ्या” अशी धमकीही दिली.
घटनेनंतर पीडित कुटुंबाने तात्काळ पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्थानकात तक्रार दिली. पोलिसांनी दोन्ही संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल तात्याबा नागरे करीत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.





















