
जळगाव मिरर | १ मार्च २०२६
नागपूर : काटोल तालुक्यातील राऊळगाव शिवारात स्थित SBL एनर्जी लिमिटेड या व्यावसायिक स्फोटके तयार करणाऱ्या कंपनीत आज सकाळी भयंकर स्फोट झाला. या दुर्घटनेत आतापर्यंत १७ कामगारांचा मृत्यू झाला असून, १८ जण गंभीर जखमी आहेत. स्फोटाची तीव्रता इतकी भयंकर होती की कंपनीचा परिसर उद्ध्वस्त झाला आणि आवाज आजूबाजूच्या गावांमध्येही पोहोचला.
स्फोटाची माहिती मिळताच पोलिस, अग्निशमन दल, एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तातडीने जखमी कामगारांना नागपूरच्या जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून, काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घटनास्थळी तातडीने तपास आणि मदतकार्य सुनिश्चित करण्याचे आदेश दिले. मृतांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकारकडून दिली जाईल, तसेच संबंधित कंपनीकडूनही आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील दु:ख व्यक्त केले असून, जखमींवर तातडीने उपचार करण्याचे आदेश दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी सुमारे ६ वाजता कंपनीत शिफ्ट सुरू झाली होती. त्यावेळी कंपनीत साधारण ३५ कर्मचारी कामावर होते, ज्यात महिलांचा समावेशही होता. अचानक एका युनिटमध्ये भयंकर स्फोट झाला. स्फोटाच्या धक्क्यामुळे परिसरात हादरे बसले आणि कंपनीचा परिसर उद्ध्वस्त झाला. घटनेनंतर कंपनीच्या बाहेर कामगारांच्या नातेवाईकांनी आणि स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली असून, कंपनीच्या गेटवर आक्रोश पाहायला मिळाला.
जखमी झालेल्या १८ कर्मचाऱ्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. काहींची प्रकृती गंभीर असल्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासन आणि पोलिस तज्ज्ञ घटनेचा सखोल तपास करत आहेत. सध्या स्फोटाचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. तांत्रिक बिघाड की मानवी चूक, याचा तपास सुरू आहे. तसेच, स्फोटके बनवणारी कंपनी असल्यामुळे सुरक्षेचे नियम पाळले जात होते की नाही, याचाही तपास केला जात आहे.
जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक घटनास्थळी असून मदतकार्याला वेग देण्यात आला आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे पथक घटनास्थळी पोहोचले असून, पीएसओ आणि डिश यांचे पथकही मदत कार्यासाठी पाठवले गेले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात प्रशासन सहभागी असल्याचे स्पष्ट केले आहे. जखमींची प्रकृती लवकर सुधारावी, अशी प्रार्थना त्यांनी व्यक्त केली आहे. ही घटना नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव शिवारातील व्यावसायिक स्फोटक तयार करणाऱ्या कंपनीत घडलेली अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद आहे. मृतांच्या कुटुंबियांसाठी राज्य शासनाने आणि कंपनीने आर्थिक मदत जाहीर केली असून, स्थानिक प्रशासन, पोलीस आणि मदत पथके घटनास्थळी मदतकार्य करत आहेत.




















