जळगाव मिरर | ६ डिसेंबर २०२५
जामनेर शहरातील भुसावळ रोडवरील सोना पेट्रोल पंपासमोरील अंबिका गॅरेजला काल रात्री अचानक भीषण आग लागली. काही क्षणांतच आगीने प्रचंड रौद्ररूप धारण केले आणि गॅरेजमधील साहित्य, वाहनांचे पार्टस, तेलकट माल उंच ज्वाळांनी पेट घेऊन लाखों रुपयाचे सामान जळून खाक झाले असून सुदैवाने कोणतीही जिवितहानी झालेली नाही.
आगीच्या प्रचंड धुराचे लोट आकाशात झेपावताच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. दुकानांचे शटर वितळून पडण्याइतकी आग भयंकर होती. घटनेची माहिती मिळताच नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांसह स्थानिक तरुणांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले तर काही काळाच्या अथक प्रयत्नानंतर अखेर आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे. आग नेमकी कशी लागली ? याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलीसांनी याबाबत तपास सुरू केला आहे.




















