
जळगाव मिरर | ५ मार्च २०२६
भुसावळ शहरातील जाम मोहल्ला परिसरातील एका हॉटेलमध्ये गॅस सिलिंडरला गळती लागल्यामुळे भीषण आग लागून मोठा भडका उडाल्याची घटना सोमवारी (२) सायंकाळी सुमारे ६ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून खरेदीसाठी आलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र संबंधित हॉटेलसह शेजारील दुकानांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जाम मोहल्ला परिसरात रमजान महिन्यामुळे रोज सायंकाळी पाचनंतर रोजा इफ्तारीसाठी खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी असते. त्याचवेळी परिसरातील एका हॉटेलमध्ये गॅस सिलिंडरला गळती लागली. काही क्षणांतच त्याचा मोठा भडका उडाला आणि आगीने रौद्ररूप धारण केले. अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात धावपळ उडाली आणि नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी पळापळ केली.
आगीच्या ज्वाळा वाढत गेल्याने शेजारील हॉटेललाही त्याच्या झळा बसल्या. आगीमुळे हॉटेलमधील साहित्य, फर्निचर व इतर वस्तू जळून मोठे आर्थिक नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच पालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाचे कर्मचारी विवेक माकोडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. त्यांच्या तत्परतेमुळे आग अधिक पसरू शकली नाही आणि मोठा अनर्थ टळला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्ष गायत्री भंगाळे तसेच नगरसेवक सचिन चौधरी यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानग्रस्त व्यावसायिकांची पाहणी केली. नुकसान झालेल्या व्यावसायिकांना त्वरित नुकसानभरपाई मिळावी यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच नगरसेवक आसीफ खान इक्बाल खान, जुनेद अशरफ खान आणि पिंटू कोठारी यांनीही घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाला सहकार्य केले. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.




















