जळगाव मिरर | २५ डिसेंबर २०२५
जळगाव शहरातील शाहू नगर परिसरात झालेल्या एमडी ड्रग्स कारवाईचे धागेदोरे मास्टर कॉलनीतील शेख अबरार शेख मुक्तार उर्फ अबरार जिलानी याच्यापर्यंत पोहोचल्यानंतर तो पसार झाला होता. दुबई पळून गेल्याचा संशय व्यक्त केला जात असतानाच, मालेगाव येथे ड्रग्सची विक्री करताना अबरार जिलानी याला पोलिसांनी रंगेहाथ अटक केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. नाशिक कारागृहातून त्याला जळगाव उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या पथकाने ताब्यात घेतले असून न्यायालयाने त्याला दि. २९ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सविस्तर वृत्त असे की, जळगाव शहर पोलीसांनी शाहू नगरात छापा टाकून साडेपाच लाख रुपयांचे एमडी ड्रग्स जप्त केले होते. या प्रकरणात सर्फराज भिस्ती या ड्रग्स माफियाला अटक करून त्याची कसून चौकशी केली असता, या अवैध व्यवसायाचे धागेदोरे मास्टर कॉलनीत राहणाऱ्या शेख अबरार शेख मुक्तार उर्फ अबरार जिलानी (वय २७, रा. मास्टर कॉलनी, आक्सानगर) याच्यापर्यंत पोहोचले होते. मात्र अटकेची कुणकुण लागताच अबरार जळगावातून पसार झाला होता.
गेल्या दहा महिन्यांपासून जळगाव पोलिसांकडून त्याचा शोध सुरू होता. दरम्यान, अबरार दुबईत पळून गेल्याची चर्चा असल्याने तपास काहीसा थंडावला होता. मात्र मालेगाव पोलिसांनी चंदनपुरी रस्त्यावरील मन्सूरा कॉलेज परिसरात ड्रग्स विक्री करणाऱ्यांवर छापा टाकला असता, अबरार जिलानी याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून तब्बल ६ लाख रुपयांचे ६० ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले होते. त्याची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला नाशिक कारागृहात रवानगी करण्यात आली होती.
दरम्यान, जळगावच्या कारवाईनंतर सुरत व भुसावळ येथे झालेल्या ड्रग्स कारवाईचे कनेक्शनही अबरारसोबत असल्याचे उघड झाले होते. त्याच्या शोधासाठी गुजरात पोलिसांनीही मास्टर कॉलनी परिसरात तपास केला होता. अखेर जळगाव उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या पथकाने नाशिक कारागृहातून अबरारला ताब्यात घेतले असून त्याची सखोल चौकशी सुरू आहे.
या चौकशीतून महाराष्ट्र व गुजरातमधील ड्रग्स माफियांचे आंतरराज्यीय जाळे उघडकीस येण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात असून, या प्रकरणामुळे ड्रग्स रॅकेटविरोधातील कारवाईला वेग येणार आहे.




















