जळगाव मिरर | १७ जुलै २०२५
जळगाव जिल्ह्यातील एका शासकीय महिला वसतिगृहाच्या प्रभारी महिला अधिकाऱ्याने थेट राज्य महिला आयोगाकडे वरिष्ठ पुरुष अधिकाऱ्याविरोधात मानसिक छळ होत असल्याची गंभीर तक्रार केली आहे. मात्र, महिला आयोगाने सदर तक्रार संबंधित खात्याकडे चौकशीसाठी वर्ग केली आहे. या प्रकाराची जिल्ह्यात पहिल्यांदाच नोंद झाली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शासकीय आशादीप महिला वसतिगृहाच्या प्रभारी अधीक्षक सानिया देशमुख यांनी २३ मे २०२५ रोजी राज्य महिला आयोगाकडे लेखी तक्रार सादर केली. त्यामध्ये प्रभारी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आर.आर. तडवी यांच्याकडून “फक्त महिला असल्याने” मानसिक त्रास दिला जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
देशमुख यांच्या म्हणण्यानुसार, वसतिगृहाच्या जबाबदारीसाठी संपूर्ण लक्ष केंद्रित करावे अशी आपली विनंती असूनही तडवी यांनी त्यांच्यावर जबरदस्तीने मुलींच्या निरीक्षण गृहाच्या अधीक्षक पदाचा अतिरिक्त प्रभार देण्याचा आग्रह धरला. यावेळी वैद्यकीय कारणे सांगून विनंती केली असतानाही ती दुर्लक्षित करण्यात आली. कार्यालयात बोलावून अपमानास्पद भाषेत तुलना केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती आपल्याशी चर्चा न करता केल्याच्या कारणावरून देशमुख यांना जाब विचारण्यात आल्याचे आणि काही कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्याचे आदेशही याच दरम्यान देण्यात आल्याची माहिती तक्रारीत देण्यात आली आहे. त्या आदेशांना आयुक्तांनी स्थगिती दिल्याचेही नमूद आहे.
वैद्यकीय रजेवरून परत आल्यानंतर वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करूनही, ते अमान्य करून धुळे वैद्यकीय मंडळाकडून प्रमाणपत्र आणण्यास सांगितल्याचा आरोपही करण्यात आला आहे. देशमुख यांनी विविध प्रसंगांमध्ये सातत्याने मानसिक त्रास होत असल्याचे नमूद करत महिला आयोगाने याप्रकरणी गांभीर्याने दखल घ्यावी व योग्य तो न्याय द्यावा, अशी विनंती केली आहे.
