जळगाव मिरर । २३ मे २०२४
जामनेर तालुक्यातील पहूर रोडवरील जेसीबी, ट्रॅक्टर स्पेअर पार्टच्या दुकानाला बुधवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास आग लागली. या आगीमुळे जवळच्या दोन्ही दुकानांनी पेट घेतला. तीन दुकानांचे आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
स्पेअर पार्टच्या दुकानात ऑईलचा साठा असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. शेजारीच असलेल्या गॅरेज व हॉटेलला देखील आगीने विळख्यात घेतले. गॅरेजमधील कार व इतर साहित्य तसेच हॉटेलचे फर्निचर जळून खाक झाले. आग कशामुळे लागली, याचे नेमके कारण समजू शकले नाही. नगरपालिकेच्या बंबांनी दोन तासात आग आटोक्यात आली. आगीत स्पेअर पार्ट दुकानाचे सुमारे २५ लाखांचे, गॅरेजचे ३ लाखांचे व हॉटेलचे ४ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तलाठी नितीन मनोरे यांनी सकाळी घटनास्थळी पंचनामा केला. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रावळ, तहसीलदार नानासाहेब आगळे, पोलिस उपनिरीक्षक सागर काळे, मुख्याधिकारी नितीन बागुल यांनी पाहणी केली.