
जळगाव मिरर | २४ ऑगस्ट २०२५
राज्यातील मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली असून, येत्या 29 ऑगस्ट रोजी मराठा मोर्चा मुंबईत धडकणार आहे. यावर ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिल्यानंतरही हे आंदोलन कशासाठी? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी येत्या 29 ऑगस्टपासून मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. त्याची जय्यत तयारी मराठा आंदोलकांकडून केली जात आहे. मराठा आरक्षणासाठी निघणारा हा मोर्चा पहिल्या मोर्च्यांपेक्षा पाच पट मोठा असेल, असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला आहे. मनोज जरांगे आपल्या मोर्चावर ठाम असून, छगन भुजबळ यावर प्रतिक्रिया दिली आहे.
मराठा समाजाला आरक्षण देण्याची त्यांची मागणी होती, ती पूर्ण केलेली आहे. मराठा समाजाला दहा टक्क आरक्षण देण्यात आले आहे. मराठा समाजाला देण्यात आलेले आरक्षण आम्ही टिकवणार असल्याचेही मुख्यमंत्री यांनी म्हटले आहे. त्यामुळे तो प्रश्न संपलेला आहे. मग हा आग्रह कशासाठी? हे कळण्याच्या पलिकडचे आहे, अशी टीका छगन भुजबळ यांनी मनोज जरांगेंवर केली.
भुजबळांनी मोर्चाच्या वेळेबाबतही नाराजी व्यक्त केली. पावसामध्ये, गणपती उत्सवामध्ये हे काय करणार आहे? मला काही कळत नाही. लोकांना का त्रास देतायेत? असा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केला. त्यांचे जर हेच म्हणणे असेल की, ओबीसीमधून आरक्षण पाहिजे, तर चार आयोगांनी आरक्षण नाकारलेले आहे. सुप्रीम कोर्टानेही फार मोठा जजमेंट दिलेले आहे, असेही भुजबळ यांनी म्हटले आहे.
छगन भुजबळ पुढे म्हणाले, बाकीच्या काही गोष्टी आहे. सारथी, बार्टी, महाज्योती या सारख्या संस्था आहेत. त्यावर आपण विचार केला पाहिजे. सारथीच्या माध्यमातून मिळणाऱ्या गोष्टींपैकी अनेक गोष्टी महाज्योतीच्या वाट्याला आलेल्या नाहीत. म्हणून मी मंत्रिमंडळात नेहमी सांगत असतो, ओबीसीची संख्या मोठी आहे, त्यांना किमान समान वागणूक द्या.
पैसे कोण देते? हे विद्यार्थ्यांना कळत नाही. आदिवासी आणि दलित समाजाला दिल्लीतून पैसे येतात. विद्यार्थ्यांना एवढेच माहिती असते की, सरकार पैसे देते, मात्र आम्ही या गोष्टी विद्यार्थ्यांना नाही सांगू शकत. मग त्यांच्या मनात असा प्रश्न निर्माण होतो, त्याला देतात मग मला का देत नाही. मुख्य सचिवांनी याच्यात लक्ष देऊन सर्वांना समान वागणूक कशी मिळेल ते बघावे असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले आहे. चांगले काम चाललेले आहे. मराठी विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न सोडवले गेले आहेत, असेही छगन भुजबळ म्हणालेत.




















