जळगाव मिरर | २६ सप्टेंबर २०२३
जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे व भाजपचे नेते गिरीश महाजन हे एकमेकांवर टीका करण्यासाठी कुठलीही संधी सोडत नाही. नुकतेच दूध संघाच्या बैठकीच्या निमित्ताने गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधला. जिल्हा दूध संघात आम्ही प्रामाणिकपणे काम करू. या ठिकाणी भ्रष्टाचार होणार नाही. आम्ही एक रुपया जरी खाल्ला तर तुमचा जोडा आणि आमचं डोकं असेल, असे गिरीश महाजन यांन एकनाथ खडसे यांच्यावरील भ्रष्ट्राचाराच्या आरोपांची आठवण करुन दिली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यावरही अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.
मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीस जिल्हा दूध संघाची सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत गिरीश महाजन यांनी शेतकऱ्यांना पारदर्शक कारभाराची हमी दिली. तसेच जिल्हा दूध संघाची पुढची वाटचाल कशी असेल याबाबतचं मार्गदर्शनही केले. जिल्हा दूध संघाच्या माध्यमातून शेतकऱ्याला पूरक व्यवसाय हा निर्माण व्हावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांनाही सुगीचे दिवस यावे यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकष्ठा करणार असल्याचे आश्वासन मंत्री गिरीश महाजन यांनी दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाराज असल्याचा दावा एकनाथ खडसे यांनी केला होता. यावरही मंत्री गिरीश महाजन यांनी टीका केली. आगामी लोकसभा निवडणुकीत आपली उतरण्याची तयारी असल्याचे खडसे म्हणाले होते. यावर महाजन यांनी त्यांना बोलण्याऐवजी निवडणूक रिंगणात उतरण्याचे आव्हान दिले. निवडणुकीत कोण किती प्रभावी आहे हे ठरेल. लोकसभा निवडणूक लढवून दाखवा, असेही महाजन म्हणाले.